देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना खोचक सवाल
पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी (Loksabha Election 2024) सुरु असताना बडे बडे नेते विरोधकांवर टीका व हल्लाबोल करत आहेत. तर अनेक पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. अशातच आज शरदचंद्र पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काम केले नाही, त्यामुळे आम्हाला करावे लागत असल्याची टीका, जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीने केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
देशात ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी जे १० लोकसभा मतदारसंघातील जागा लढवत आहे, ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि त्यावर आम्ही असे करू तसे करू, असे म्हणतात. यावर कोणाचा विश्वास बसेल का? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठी शक्ती प्रदर्शन करण्यात आले त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत नक्की विजय संपादित करेल, असा विश्वास देखील या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र
महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, असे असले तरी नेमक्या किती जागा जिंकणार याचा आकडा त्यांनी स्पष्ट केला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र आहोत. महायुतीमध्ये सर्व आलबेल आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तीढा जवळपास सूटला असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.
बारामतीची जनता मोदींच्या पाठीशी
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना निवडून देणे म्हणजे राहुल गांधींना निवडून देणे, तर सुनेत्रा पवार यांना निवडून देणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करणे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बारामतीची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे,असे सांगतात देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील,असा दावा देखील केला आहे.