Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृती‘गण गण गणात बोते मंत्र जपा’

‘गण गण गणात बोते मंत्र जपा’

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

मी भारती उमेश लिमये राहणार पुणे. मला गजानन महाराजांची जी प्रचिती आली, तो अनुभव मी आता आपल्यासमोर मांडत आहे.

मूळचे आम्ही पुण्याचे. परंतु माझी मावशी नागपूरची पांडे तिचे आडनाव. तिच्याकडे दरवर्षी आम्ही गजानन महाराज प्रकट दिन आणि गुरुपुष्यामृत या दिवशी प्रसादासाठी जायचो. त्यामुळे आम्हीसुद्धा सर्व जण गजानन महाराजांचे भक्त झालो.

दरवर्षी आम्ही शेगावची वारी न चुकता करतो. माझी मैत्रीण साधना ही अकोल्याची आहे. पुण्यामध्ये ती माझ्यासमोरच्या घरी राहते. त्यांच्या घरी सर्वजण गजानन महाराजांचे निस्सिम भक्त आहेत. तिच्या सासूबाई रोज संध्याकाळी गजानन महाराजांचा अध्याय वाचून आरती करून, सर्वांना अंगारा लावतात. ती मला गप्पा मारताना म्हणाली, “भारती तुझ्याकडे अंगारा पुडी आहेत का? माझ्याकडच्या संपल्या आहेत.” मी तिला म्हणाले.

“ हो आहेत ना. मी तुला उद्या देते.” मी माझ्याजवळच्या सर्व अंगाराच्या पुड्या दुसऱ्या दिवशी साधनाच्या सासूबाईंना दिल्या. रोज संध्याकाळी मी गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचते. त्या दिवशी मी अध्याय वाचायला बसले आणि माझ्या मनात विचार आला, ‘मी सगळ्या अंगाऱ्याच्या पुड्या दिल्या आता माझ्याकडे एक पण अंगाऱ्याची पुडी नाही. आता कधी दर्शन होणार कोण जाणे.’

या दिवसात संपूर्ण जगावर कोविडचे सावट होते, त्यामुळे प्रवासावर निर्बंध होते आणि वाहतूक जवळजवळ बंदच होती. मी अध्याय वाचायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य. पान उलटले तर पोथीमध्ये अंगारा दिसला. हे कसे झाले असावे, अशा विचाराने माझ्या डोळ्यातून अश्रूवाहू लागले. मी पोथी वाचताना कधीच उदबत्ती लावत नाही. उदबत्ती बाहेरच्या हॉलमध्ये असते व देवघरात फक्त निरांजन असते. त्यामुळे अंगारा बघून मी धन्य झाले आणि कधी जाऊन एकदा महाराजांचे, समाधीचे दर्शन घेते, त्यांची भेट घेते असे झाले. माझ्या मनातले विचार मी माझ्या पतीला उमेशला सांगितले की, “मला शेगावला जायचे आहे.” ते म्हणाले की, “कोविड जरा संपू दे. मग आपण जाऊ. रेल्वेचे रिझर्व्हेशन पण मिळणार नाही.” मी म्हणाले, “नाही प्रयत्न तर करा. नाही तर आपण गाडी किंवा बसने जाऊ.” त्यांनी ऑनलाइन दोन तिकिटे मिळवली. मला आता काही सूचत नव्हते. कधी एकदा शेगावला जाऊन महाराजांना भेटते असे झाले होते. महाराजांच्या ओढीने डोळ्यातून सारखे अश्रू येत होते.

शेगावला पोहोचताच सगळं आवरून, आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये कोविडमुळे व्यवस्था एकदम चोख होती. दोन भक्तांमध्ये बरेच अंतर ठेवले होते. प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची सोय होती. महाराजांच्या समाधीसमोर उभे राहिले आणि घळा घळा आनंदाश्रू डोळ्यातून वाहू लागले. दर्शन घेऊन मी पारायण कक्षात फोटो समोर आले तेवढ्यात एक पांढरा सदरा, डोक्यावर टोपी असलेले सेवक माझ्यासमोर आले आणि माझ्या हातात चार अंगाऱ्याच्या पुड्या ठेवल्या. आणि म्हणाले “माऊली हा अंगारा घ्या.” आतापर्यंत मी बऱ्याच वेळा शेगावला गेलेली आहे. प्रत्येकवेळी अभिषेक केला की पावती आणि प्रसादाबरोबर अंगाऱ्याची पुडी मिळते. इथे मात्र माझ्या हातात महाराजांनी स्वतः अंगारा दिला. मी जागीच स्तब्ध झाले. यंत्रावत हात पुढे केले आणि अंगारा घेतला. नंतर मला बोध झाला, मी भानावर आले आणि धावत गेले. पण तो माणूस मला कुठेच दिसला नाही.

साक्षात महाराजांनी येऊन, माझ्या हातात अंगारा दिल्यासारखे परमभाग्य अजून कोणते? कायम मी महाराजांची ऋणी राहीन. महाराज, कुठलेही संकट आले आणि तुमचा जप केला की खरोखरच तुम्ही प्रत्येक भक्ताला त्या संकटातून बाहेर काढता, याची प्रचिती मला वेळोवेळी मिळत आली आहे. आज तर तुम्ही मला स्वतःच्या हाताने अंगारा दिला. आधी पोथीतून मला अंगारा पाठवलात आणि नंतर शेगावला बोलवून स्वहस्ते अंगारा दिलात. अशीच तुमची कृपा सदैव माझ्या कुटुंबावर, सर्व भक्तगणांवर राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -