इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांतील प्रचारात एकमेकांवर शरसंधान करण्याची सत्ताधारी व विरोधी पक्षांत मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. सरकारच्या निर्णयांवर किंवा योजनांवर टीका करणे हे समजता येईल; पण कोणाला वैयक्तिक नालायक, कोडगा, वेडा, मूर्ख, मनोरुग्ण म्हणून जाहीरपणे हिणवणे हे कितपत योग्य आहे. एक माजी मुख्यमंत्री दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा व आजी उपमुख्यमंत्र्यांचा कोडगा नि नालायक अशा शिवराळ भाषेत बोलून पाणउतारा करीत असेल; तर हीच का ती महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असा प्रश्न पडतो. राजकारणात जय-पराजय होत असतात. सत्ता येते व जाते. पक्ष फुटणे आणि सरकार कोसळणे या घटना घडतच असतात. कोण केव्हा कोणाच्या प्रलोभनाला बळी पडेल याची शाश्वती नसते. पण सत्ता संघर्षाच्या काळात व निवडणुकीच्या राजकारणात डोक्यावर बर्फाचा खडा आणि तोंडात खडीसाखर ठेवणारे फारच थोडे भेटतात. आपली सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा तोल सुटला आहे असे वाटू लागले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीच सत्तेच्या परिघात नव्हते. ते केंद्रातही मंत्री झाले असते आणि राज्यातही मुख्यमंत्री होऊ शकले असते; पण त्यांनी सामान्य शिवसैनिकांना सत्तेवर बसवले. त्यांनी जाहीर सभांमध्ये विरोधकांचे विशेषत: काँग्रेसचे अनेकदा वाभाडे काढले. संवेदनशील प्रश्नावर बोटचेपे धोरण स्वीकारणाऱ्या नेत्यांचे त्यांनी अनेकदा वस्त्रहरण केले. पण त्यामागे सत्तेचा माज नव्हता किंवा अहंकार कधी दिसला नाही. व्यासपीठावरून उतरल्यावर शिवसेनाप्रमुख अगदी साधे असायचे. सर्वांमध्ये मिसळायचे. हास्यविनोद करायचे. आपल्या मिष्किल कोट्यांनी धमाल उडवून द्यायचे. म्हणूनच अन्य पक्षांतील विरोधकांनाही त्यांचे आकर्षण होते. सर्वच पक्षात त्यांचा आदर केला जायचा. मग उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एवढे का घसरले आहेत?
देशपातळीवर भाजपाचे अन्य नेते रोज काँग्रेस पक्षाची कुंडली बाहेर काढत आहेत. भ्रष्टाचार व घराणेशाहींवरून काँग्रेस पक्षाला रोज झोडपून काढत आहेत. महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे हे आपला पक्ष फोडल्याचे खापर सतत देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडत आहेत. राज्यात काँग्रेस हा भाजपाशी लढायला सक्षम आहे असे दिसत नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही मोजक्या जागांवर आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडत आहे. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस तर भाजपाच्या वळचणीला येऊन सत्तेत बसली आहे. उद्धव ठाकरे रोज मोदी-शहा आणि फडणवीस यांच्यावर एक से एक भन्नाट आरोप करून मीडियाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात ठाकरे यांचे नाव न घेता डुप्लिकेट शिवसेना अशी खिल्ली उडवताच उद्धव यांना त्याचा राग आला, त्यांनी लगेचच मोदींची डिग्री नकली असल्याची टीका केली. निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून मोदी, शहा आणि फडणवीस यांना सातत्याने आपल्या अंगावर घेत आहेत. या तिघांना त्यांनी आपल्या हल्ल्याचे टार्गेट बनवले आहे. मोदी-शहांवर टीका केली की देशभर त्याला प्रसिद्धी मिळते हे त्यांना ठाऊक असावे. पश्चिम बंगालमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल करीत असतात; पण ममता व उद्धव यांच्यात मोठा फरक आहे. ममता यांनी स्वबळावर मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रीक केली आहे. त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट व काँग्रेस पक्षाला जवळपास संपवले आहे. त्यांच्याकडे सत्ता व राज्यभर पक्ष संघटना मजबूत आहे. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर अडीच वर्षांत सत्ता गमवावी लागली. मुख्यमंत्रीपद तर गेलेच; पण पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गमवावे लागले. मशाल चिन्ह घेऊन पक्ष वाचविणे हे सर्वात महत्त्वाचे आव्हान उद्धव यांच्यापुढे असताना ते मोदी, शहा व देवेंद्र यांच्यावर असभ्य भाषेत का टीका करीत आहेत?
मातोश्रीवरील शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत अमित शहा यांनी मला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, असे सांगून काही दिवस उद्धव ठाकरे यांनी धुरळा उडवला. अमित शहा यांनी त्याचा साफ इन्कार केला तरी भाषणात व मुलाखतीत बाळासाहेबांची ती खोली म्हणजे आपल्याला ते पवित्र मंदिर असल्याचे सांगून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपले चिरंजीव आदित्य यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो, अडीच वर्षांनंतर ते मुख्यमंत्री होतील व आपण दिल्लीला जातो असे म्हटले होते, असे उद्धव आता सांगत आहेत. २०१९च्या निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजपामध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा समझोता झालाय, असे त्यांनी कधीच जाहीरपणे म्हटले नव्हते. तसेच गेल्या साडेचार वर्षांत देवेंद्र यांनी आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असे म्हटल्याचेही कधी सांगितले नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या काळात आपण नवीन गौप्यस्फोट करीत आहोत, असा उद्धव यांनी आव आणला असला तरी त्यावर भाजपावाले आणि मोदी समर्थक विश्वास कसा ठेवतील?
शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावर केलेल्या दसरा मेळाव्यातील शेवटच्या भाषणात उद्धव व आदित्यला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले होते. उद्धव यांनी शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री करणार असा शब्द शिवसेनाप्रमुखांना दिला होता; पण उद्धव स्वत: मुख्यमंत्री होतील किंवा आदित्य त्यांच्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री होतील, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी भाजपाशी युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली. १०५ आमदार असलेल्या भाजपाला मुख्यमंत्रीपद न देता, ५४ आमदारांच्या पक्षाचा प्रमुख स्वत:च मुख्यमंत्री झाला. त्यातून जनतेत चुकीचा संदेश जातोय, याचेही भान ठेवले नाही. शिवसेनाप्रमुख हे किंगमेकर होते; पण पक्षप्रमुख हे स्वत:च किंग झाले. तेही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने. याचीच खदखद पक्षात वाढत गेली.
आदित्यला मुख्यमंत्री म्हणून मी तयार करतो आणि मी दिल्लीला जातो, असे देवेंद्र फडणवीस हे उद्धव यांना आश्वासन देतात यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. देवेंद्र ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे सर्व निर्णय मोदी-शहा घेत असतात. भाजपाबरोबर एकनाथ शिंदे गट आल्यानंतर देवेंद्रच मुख्यमंत्री होतील, असे सर्वांना शंभर टक्के वाटले होते; पण शिंदे यांनी दाखवलेल्या धाडसाची किंमत म्हणून भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. राज्याचे नेतृत्व कोणी करावे हे हायकमांड ठरवते, मग आदित्यला आपण मुख्यमंत्री म्हणून तयार करतो असे देवेंद्र कसे सांगू शकतील?
यावर्षी अयोध्येला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमालाही उद्धव ठाकरे हजर राहिले नाहीत, त्याचे कारण त्यांनी जाहीर केले नाही. ते मुख्यमंत्री असताना नवनीत राणा यांना जेलमध्ये पाठवले गेले. कारण काय तर हनुमान चालिसा पठण करणार असे त्यांनी जाहीर केले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरे कुटुंबीयांचा कसा सर्वत्र हस्तक्षेप होता हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीरपणे सांगत आहेत. त्यावर ठाकरे मौन पाळून आहेत. शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या खात्यात व महापालिकेच्या कारभारात आदित्य रस घेत असे हे जगजाहीर होते. रस्ते विकास महामंडळाच्या बैठकाही आदित्य बोलवत असत. अडीच वर्षांच्या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून ठाकरे हे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात केवळ दोन वेळा गेले असतील, त्यांच्या कारभाराबाबत काय बोलावे?
आमचे मित्र उद्धव ठाकरे हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत, त्यांना वेड लागले आहे, मला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव यांनी देवेंद्र यांना नालायक, कोडगे म्हणून संबोधले; पण त्यांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे देवेंद्र यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे देवेंद्र यांना नालायक म्हणाले. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. गेल्या वेळी मोदींचे फोटो लावून १८ खासदार निवडून आणले. आता मोदींचा फोटो नाही, उबाठा सेनेचे दोन-चार सुद्धा निवडून येणार नाहीत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावले आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एक नकली वाघ डरकाळ्या फोडून गेला. आजवर एकच वाघ होऊन गेला, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मी रिंग मास्टर असल्याने वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळ्या ओळखतो, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. निवडणुकीचा प्रचार नालायक, कोडगे, वेडे, मूर्ख या भोवती फिरतो आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…