दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी
नवी मुंबई(प्रतिनिधी): वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी एपीएमसी मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. संजय पानसरे यांनी मे.निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ हजार रुपये इतके असताना ते ८ हजार रुपये इतके कमी करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांची २ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
एपीएमसी मार्केट वरील संचालक व आजी माजी अधिकाऱयांनी कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून आपल्या मर्जीतल्या संस्थांना वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रसाधनगृहांचे मनमानीपणे वाटप करुन एपीएमसी मार्केटचे तब्बल ७ कोटी ६१ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदें यांच्यासह बाजार समितीतील आजी माजी अधिकारी अशा ८ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह अपहार, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्हे शाखेने या प्रकरणात सहभागी असलेल्या सुरेश मारु, मनेश पाटील व सिद्राम कटकधोंड या तिघांना अटक केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी एपीएमसी मार्केट वरील माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. संजय पानसरे व इतर संचालकांनी भाजीपाला मार्केटमधील मे.निर्मला औद्योगिक संस्थेचे ६१ हजार रुपये मासिक भाडे असताना, ते ८ हजार रुपये इतके कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी या प्रस्तावाला संजय पानसरे यांनी अनुमोदन दिले होते. त्यामुळे संजय पानसरे यांना एपीएमसी मार्केटमधील प्रसाधनगृह वाटप प्रक्रियेमध्ये आर्थिक लाभ मिळाल्याचा तसेच पानसरे व प्रसाधनगृह चालवणाऱ्या मे.निर्मला औद्योगिक संस्था यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
तसेच पानसरे यांचा इतर प्रसाधनगृह चालकांशी देखील आर्थिक हितसंबध असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने बुधवारी संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती दुपारी ४ वाजता अटक केल्यानंतर त्यांना सीबीडी बेलापूर येथील जिल्हा व अति. सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
चौकट