यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि रॅली यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रचारसभांमुळे नेते मंडळीची देखील धावपळ होत आहे. त्यामध्ये उन्हाचा पारा राज्यामध्ये ४० अंश पार झाल्यामुळे सुर्य देखील आग ओकत आहे. याचा परिणाम राजकीय नेत्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. परभणीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भरसभेमध्ये भोवळ आली.
कडक उन्हाळ्यामध्ये भाजपाचे अमित शाह यांचा देखील अमरावतीमध्ये प्रचार दौरा आहे. यावेळी भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली. सदर घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली. गडकरींना बोलता बोलता भोवळ आल्यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते तातडीने त्यांच्या मदतीला धावले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना देखील उष्माघाताने चक्कर आली होती. धाराशिवमध्ये कडाक्याच्या उन्हामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रचाररॅली सुरु होती. रॅलीमध्येच त्यांना अचानक भोवळ आली. आमदार कैलास पाटील यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना उष्माघातामुळे हा त्रास झाला असल्याचे सांगण्यात आले. आता नितीन गडकरी यांना उन्हाचा त्रास झाला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढलेला असताना राजकीय नेत्यांना प्रचार सभांचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.