मोदी आणि शहा साहेबांना चॅलेंज करण्याऐवढं उद्धव ठाकरे मोठा नाही
संजय राऊतांवर भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात
मुंबई : सध्या देशभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी प्रचारासाठी सभांचा धडाका लावला आहे. यात भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर देत भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, आज मोदीजींची गॅरेंटी व पंतप्रधान मोदींवर लोकांचा इतका विश्वास आहे की, मोदी यांच्या सभेत लोकांना उभं राहण्यासाठी जागा कमी पडते. मोदीजींच्या सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यामुळेच मोदीजींची हवा कुठे आणि कशी आहे हे सर्वांना ४ जूनला समजेल. मात्र, भाजपावर टीका करण्याआधी संजय राऊत यांनी त्यांच्या ‘श्रीमान योगी प्रतिष्ठान’ संस्थेबद्दल खरं सांगावं, असे आवाहन यावेळी नितेश राणे यांनी केले. श्रीमान योगी प्रतिष्ठान ही संस्था नक्की कोणासाठी व का स्थापित केली? काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही संस्था काढली आहे का? अशा प्रश्नांची सर्व उत्तरं संजय राऊतने खरी द्यावी अन्यथा आम्ही पीओडब्लूकडे याची तक्रार करणार आहोत, असे नितेश राणे यांनी म्हटले.
मोदी आणि शहा साहेबांमुळेच उबाठा आहे
मोदी आणि शहा साहेबांना चॅलेंज करण्याऐवढं उद्धव ठाकरे मोठा माणूस नाही. कारण, त्यांनीच उद्धव ठाकरेंना मोठं केलं आहे. मोदी हे १४ व १९ ला नसते तर उबाठा गटाचे आमदार व खासदार निवडून आले नसते असे नितेश राणे यांनी यावेळी म्हटले.
उबाठावर चिरपाटणकर सोडून कोणाचाही विश्वास नाही
शिवसेनेच्या सातबाऱ्यांवर गद्दारांची नावं लिहली तसेच शेतकऱ्यांचा सातबारा बदलतील अशी भीती आहे. शिवसेनेच्या सातबारावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच नाव लिहलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, कोणताही शब्द पाळला नाही फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या. म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा चोरमाणूस असल्याचं कळलं आहे. यांच्या शब्दावर चिरपाटणकर सोडून कोणाचाही विश्वास नाही.
पुन्हा एकदा कमळच फुलणार
हिंदुत्वाला बदनाम केल्यामुळे विरोधकांवर चिखल उडालं आहे. नांदेडमध्ये कितीही चिखल-चिखल ओरडलात तरीही चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली आणि अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा कमळच फुलणार असे नितेश राणे यांनी म्हटले.
दिपक केसरकर आणि राणेसाहेब एकत्र आल्यामुळे विनायक राऊतांची झोप उडाली आहे. कोकणाचे विकास करण्यापासून आता कोणीही थांबवू शकणार नाही. कारण कोकणाचे सर्व सूपूत्र एकत्र येऊन कोकणाचा विकास करणार आणि ४जून नंतर विनायक राऊतांना हद्दपार करणार. तसेच सभेमध्ये आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.