अमरावती : अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना विजयी करण्याची विनंती गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी केली होती. यावरुन शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे. मात्र, शरद पवारांना माफी मागायचीच असेल तर विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्यांची माफी मागावी. त्या मृत शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागावी, असे आव्हान अमित शहा यांनी शरद पवारांना दिले आहे. तुम्ही इतकी वर्षे मुख्यमंत्री होतात, केंद्रीय कृषीमंत्री होतात, तरी विदर्भातील सिंचन प्रकल्प का पूर्ण झाले नाही? असा प्रश्न अमित शहा यांनी पवारांना विचारला.
अमरावती लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
शरद पवार यांना राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, आरोग्याचे कारण देत ते सोहळ्याला गेले नाहीत. मात्र, आता निवडणुकीचा प्रचार करताना कसे फिरत आहेत? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांना देखील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण दिले होते मात्र, ते सोहळ्याला आले नाही, असे देखील अमित शहा म्हणाले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना देखील राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, ते पोहोचले नाहीत. आता अमरावतीमध्ये मतदान मागण्यासाठी येत आहेत. मात्र जोपर्यंत आयोध्यात राम मंदिरात जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचे म्हणणे कोणीही ऐकणार नाही,अशा शब्दात अमित शहा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
कलम ३७० हटवण्यासाठी राहुल गांधी यांनी विरोध केला होता. तसे झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आता पाच वर्षे झाले आहेत. या पाच वर्षात मातीचा कणही जाळण्याची कोणाची हिम्मत झाली नसल्याचा दावा केंद्रीय गृहमत्री अमित शहा यांनी केला आहे.