
नवी मुंबई(प्रतिनिधी) : ट्रकमधुन गव्हाच्या पोत्याखाली लपवून नवी मुंबईत(navi mumbai) आणला गेलेला सुमारे ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी ट्रक चालक व सदरचा गुटखा घेण्यासाठी आलेला आरोपी या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आता या गुटख्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या इतर दोघांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी या कारवाईत २० लाख रुपये किंमतीचा ट्रक व ९ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गहु देखील जप्त केला आहे. सदर गुटख्याचा साठा हा मध्यप्रदेश राज्यातून नवी मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आल्याचे तपासात आढळुन आले आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटख्याचा साठा घेऊन एका ट्रक पावणे एमआयडीसीमध्ये येणार असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले व त्यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी पावणे एमआयडीसी भागात सापळा लावला होता. मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ट्रक चालक शैलेश दयाल सिंग (२७) हा मध्य प्रदेश येथून आपल्या ट्रकमधुन गव्हाच्या पोत्याखाली गुटख्याचा साठा लपवून घेऊन पावणे एमआयडीसी मध्ये आला होता. यावेळी आरोपी अनिरुद्ध महेश्वरी यांच्या सांगण्यावरुन सदर गुटख्याचा साठा ताब्यात घेण्यासाठी रिपन रंजन देव (२४) हा गेला होता.
यावेळी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारुन संशयीत ट्रकची तपासणी केली असता, गव्हाने भरलेल्या पोत्याखाली महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तब्बल ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी ट्रकसह गुटख्याचा साठा तसेच गव्हाचा साठा असा सुमारे ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालक शैलेश सिंग व रिपन देव या दोघांना अटक केली. पोलिसांनी आता या गुटख्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या अनिरुध्द महेश्वरी व पवन गुप्ता या दोघांचा शोध सुरु केला आहे.