बालेकिल्ल्यातल्या प्रकारामुळे शरद पवार गटाची नाराजी; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
बारामती : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. यानंतर राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) मिळालं तर, शरद पवार गटाला (Sharad Pawar) ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, याच तुतारीमुळे बालेकिल्ला असलेल्या बारामतीत (Baramati Loksabha) शरद पवारांसमोर एक मोठी अडचण उभी ठाकली आहे. या ठिकाणी एका अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी निवडणूक आयोगात (Election commission) धाव घेतली आहे.
बारामती म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांसाठी अटीतटीचा सामना असणार आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद भावजयीची लढत पाहायला मिळणार आहे. पण निवडणुकीपूर्वीच शरद पवारांसमोर एक मोठं संकट आलं आहे. सुप्रिया सुळे या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याने जर ‘तुतारी’ हेच चिन्ह अपक्ष उमेदवाराला मिळालं तर मतदारांचा गोंधळ उडू शकतो आणि मतं फिरु शकतात. त्यामुळे शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
कसे झाले चिन्हवाटप?
बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला पडताळणी झाली. त्यामध्ये पाच अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत. या ३८ उमेदवारांना काल चिन्हांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सोयल शहा युनूस शहा शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे.
हा निर्णय माझ्या हातात नाही : जिल्हा निवडणूक अधिकारी
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला वाटप केलेली चिन्हे आहेत. या चिन्हांबाबत काही आक्षेप असल्यास त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. सुहास दिवसे यांनी सागितले.