मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे
मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांमुळे निर्णायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी केलेल्या आवाहनाला मराठवाड्यात चांगलाच प्रतिसाद मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. महायुतीच्या उमेदवारांना या सभांमुळे नक्कीच बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मराठवाड्यातील तीन मतदारसंघात निवडणूक होणार आहे. नांदेड, हिंगोली व परभणी लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मराठवाड्यात दौरे करून, आपापल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खा. प्रताप पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते. भाजपाने पुन्हा त्यांनाच नांदेडमधून उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांची मराठवाड्यातील ही सभा वादळी ठरली.
खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसने माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते आ. अमित देशमुख, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आदींच्या सभा नांदेडमध्ये पार पडल्या. या सर्वच नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन कमी शब्दात, तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने त्यांच्यावरच भाषणातून जास्त टीका केली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेडमधून अविनाश भोसीकर या लिंगायत समाजाच्या तरुणाला उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारार्थ ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचारसभा पार पडली. त्यामध्ये त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांवर जाहीर सभेतून तोंडसुख घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचा जाहीर पंचनामा केला. देशाच्या विकासात काँग्रेस व इंडिया आघाडी कसे अडथळे आणत आहेत, याचे त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरणही दिले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. हिंगोली लोकसभा मतदारसंघात आधी खा. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु नंतर भाजपाच्या आमदारांनी त्या उमेदवारीला विरोध केल्याने, ऐनवेळी हिंगोली लोकसभेचा उमेदवार बदलण्यात आला. हिंगोली हा शिवसेनेचा गड आहे. त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची उमेदवारी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना देण्यात आली. त्यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे तसेच संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे परिश्रम घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या सभेत हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना विजयी करून माझे हात बळकट करा, असे आवाहन केल्याने, त्यांच्या सभेचा परिणाम हिंगोलीतील मतदारांवर नक्कीच होईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचार सभा घेऊन, त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. परभणी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली, तर त्यांच्याविरुद्ध महायुतीतर्फे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीत जाहीर सभा घेतली. त्या जाहीर सभेत त्यांनी नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादीपासून मतदारांनी सावध राहावे, असे आवाहन केले. दहशतवादी याकूब मेमन यांच्या कबरीवर डोके टेकविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. कलम ‘३७०’, राम मंदिर यांसारख्या मुद्द्यांसाठी ज्यांनी देशात विकासात्मक कामे केली, अशा पक्षाचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेत जबाबदार प्रतिनिधी पाठवा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे परभणीतील राजकीय वातावरण बदलले आहे. महादेव जानकर यांच्या विजयासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते प्रचार सभा घेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नांदेड जिल्ह्यात सभा घेऊन, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तसेच मुखेड या दोन तालुक्यांत त्यांच्या विक्रमी सभा झाल्या. एकंदरीत या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत २६ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने, अंतिम टप्प्यात आलेला प्रचार काय निकाल देईल, हे भविष्यात कळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या झालेल्या निर्णायक सभा भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना विजयासाठी बळकटी देणाऱ्या ठरणार आहेत. दरम्यान नांदेड, हिंगोली व परभणी लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरत असताना, मराठा समाजाच्या नेत्यांना ग्रामीण भागात मराठा आंदोलकांच्या रोषाला व आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे.
नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यात मराठा नेत्यांच्या सभा गावकऱ्यांनी पिटाळून लावल्या. लोकसभा निवडणूक तोंडावर असली, तरी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत अनेक गावांत मराठा आंदोलकांनी गावबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. मतदानावर या रोषाचा परिणामही दिसून येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत मराठा समाजासाठी या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. तसेच मराठा समाजासाठी शरद पवारांनी काहीही केलेले नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिले, १० असे सांगून मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहावे व महायुतीला विजयी करावे असे आवाहन केले. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी वगळता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर लोकसभा मतदार संघासाठी पुढील टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. मराठवाड्यातील मतदार कोणत्या पक्षाला पसंती दर्शवतील, हे निकाला अंती स्पष्ट होणार आहे.
[email protected]