शासन विभागात याच महिन्यात चोरीची दुसरी घटना
मुंबई : संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा म्हणजेच मंत्रालयाच्या (Mantralaya) बँकेतून मोठी रक्कम चोरी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department) खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार चोरीला गेले आहेत. मंत्रालयात प्रवेश करताना प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. सीसीटीव्हीने सगळ्यांवर नजर असते तरीही हा प्रकार घडल्यामुळे यंत्रणा सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात ४७ लाख ६० हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात चौघांवर कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७३, ३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
याआधीही पर्यटन विभागातून झाली होती चोरी
अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे तब्बल ६७ लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलीस करत आहेत. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.