
गुजरातच्या तापी नदीत दोन दिवस सुरु होती शोधमोहिम
सुरत : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबारानंतर बॉलीवूडसह संपूर्ण देश हादरला. या गोळीबाराचं कनेक्शन थेट बिष्णोई गँगसोबत लावण्यात आलं. त्यानंतर त्याचे अनेक दाखलेही समोर आले. रविवार १४ एप्रिल रोजी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. दोन्ही आरोपींना ७२ तासांच्या आत गुजरातमधील भूज येथून पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे अन्वेषण शाखेला (Crime Branch) मोठं यश मिळाले आहे. गुजरातमधील सूरत येथे तापी नदीत (Tapi River) फेकलेलं दुसरं पिस्तुल पोलिसांनी हस्तगत केलं आहे.
सलमान खान प्रकरणात आरोपींच्या प्राथमिक चौकशीत गुन्ह्यातील हत्यार दोघांनी वांद्रेतच फेकल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक (Daya Nayak) यांनी प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर गुजरातमध्ये पोलिसांना महत्त्वाची लीड मिळाली. त्याचा तपास करण्यासाठी सध्या मुंबई गुन्हे शाखेची एक टीम गुजरातमध्ये दाखली झाली.
गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल सुरतमधील एका नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या तपास पथकाकडून सलग दोन दिवस तापी नदीत शोधमोहिम सुरू होती. या दोन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर दोन पिस्तुल आणि ३ मॅगझिन नदीत सापडल्या. कालपासून गुन्हे शाखेचे पथक गुजरातच्या तापी नदीत शोधमोहिम करत होते. युनिट ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वात शोधमोहिम सुरू होती.
शूटर्सला १० राउंड गोळीबार करण्याचे होते आदेश
मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर १० राऊंड गोळीबार करण्याचे आदेश हल्लेखोरांना देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी आपले शस्त्र सूरतमधील तापी नदीत फेकले असल्याची माहिती दिली. ज्या ठिकाणी पिस्तुल फेकण्यात आले, त्या ठिकाणी आरोपी विक्की गुप्ता याला नेण्यात आले होते. त्यानंतर शस्त्र शोधण्यास सुरुवात झाली. गोळीबार प्रकरणातील आरोपींविरोधात मुंबई पोलीस आणखी कलमे जोडण्याची शक्यता आहे.