लडाख : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर ‘४०० पार’चं मिशन यशस्वी करण्यासाठी भाजप कंबर कसून प्रयत्न करत आहे. भाजपने आता लोकसभेसाठी उमेदवारांची १४वी यादी जाहीर केली आहे. यात प्रसिद्ध खासदाराचा पत्ता कट झाला असून दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. भाजपने लडाख (Ladakh) मतदारसंघातून विद्यमान खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांच्या जागी ताशी ग्याल्सन (Tashi Gyalson) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
लडाखचे विद्यमान भाजप खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी ६ ऑगस्ट २०१९ रोजी लोकसभेत कलम ३७० वरील चर्चेदरम्यान जोरदार भाषण केले होते. त्यांचे भाषण इतके व्हायरल झाले की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करुन त्यांचे कौतुक केले होते. नामग्याल भाजपच्या काही प्रसिद्ध खासदारांपैकी एक होते. दरम्यान, लडाखमध्ये स्थानिक विरोधामुळे भाजपने त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
BJP announces the candidature of Tashi Gyalson from Ladakh Constituency replacing its current MP Jamyang Tsering Namgyal from this seat.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/lqd8fkMlbp
— ANI (@ANI) April 23, 2024
कोण आहेत ताशी ग्याल्सन?
ताशी ग्याल्सन हे प्रदीर्घ काळापासून भाजपशी संबंधित आहेत. आता ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असून, ते हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर आहेत. याशिवाय ताशी व्यवसायाने वकील आहेत. येथे त्यांची काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवांग रिग्जिन जोरा यांच्याशी स्पर्धा आहे.