तर कार्यालयात काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नाही
सांगली : महाविकास आघाडीतल्या वादामुळे सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha) जागा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाने (Thackeray group) कोणत्याही सल्लामसलतीशिवाय आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचे (Congress) नेते अत्यंत नाराज झाले. मात्र, अंतिम जागावाटपातही ही जागा ठाकरे गटाकडेच राहिली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर मविआने अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकूनही त्याचा उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. विशाल पाटील बंडखोरीवर ठाम असून त्यांनी आपल्या कार्यालयाचं नावही बदललं आहे.
सांगलीत विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते उभे राहिले आहेत. याचा धक्का मविआला पोहोचणार असून निवडणुकीत सांगलीमध्ये मविआचं नुकसान होणार आहे. त्यामुळे मविआने विशाल पाटलांवर निलंबनाची कारवाई करु, असा दबाव टाकण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरेंनीही या प्रकरणी दबावतंत्र वापरलं. मात्र, विशाल पाटील यांनी कोणालाही न जुमानता आपला निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे हा मविआसाठी मोठा धक्का आहे.
विशाल पाटील यांनी आपल्या कार्यालयाचं नाव बदलून ‘वसंतदादा भवन’ असं ठेवलं आहे. शिवाय कार्यालयात एकाही काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. पाटील घराण्यावर अन्याय झाला असल्याची भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे. उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. मात्र, विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे येत्या दिवसांत सांगलीत आणखी काय काय उलथापालथी घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाठिंबा नाही
विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीची निवडणूक खासदार संजय पाटील (Sanjay Patil) विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीत अद्याप सांगली काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते चंद्रहार यांच्यासोबत दिसत असले तरी, ग्राउंडवरील काँग्रेस कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते चंद्रहार यांच्या प्रचारापासून चार हात दूर आहेत. त्यामुळे मविआसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.