- परामर्ष : हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार
आज भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात मागणीचा विस्तार होत आहे. २०२३-२४ मध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये २९ टक्के, निफ्टी स्मॉल कॅपमध्ये १०० टक्के आणि निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकात ७० टक्के वाढ झाली. देशाचा विकास होण्याच्या दृष्टीने शेअर बाजारात तेजी असणे, तेथे नवनवीन कंपन्या भागविक्रीसाठी येणे आणि भागविक्री झाल्यानंतर त्यांचे बाजारातील भाव वधारणे, हे गुंतवणुकीसाठी स्वागतार्ह म्हटले पाहिजे.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने प्रथमच ७५ हजार अंशांचा ऐतिहासिक टप्पा ओलंडला होता. नंतर दोन दिवस बाजारात पडझड झाली, तरी ते करेक्शन आहे. निवडणूक निकालापर्यंत बाजारात असे चढ-उतार सुरूच राहतील. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सने ७० हजारांवरून विक्रमी ७५ हजार अंशांची पातळी गाठली. गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये सेन्सेक्सने १० हजार अंशांची कमाई केली. मार्च तिमाहीतील कंपन्यांची मजबूत आर्थिक कामगिरी आणि निवडणूकपूर्व तेजीमुळे बाजाराचा वेग असाच कायम राहण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४०० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचले. विशेष म्हणजे, हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या १.३३ पट आकाराच्या समतुल्य आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात अवघ्या ९ महिन्यांच्या कालावधीत १०० लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक आणि सेबी यांसारख्या नियामक संस्थांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांमधील वाढलेल्या मूल्याकंनाबाबत चिंता व्यक्त केली; मात्र हा सौम्य धक्का पचवल्यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात जोरदार पुनरावृत्ती केली. गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत गृहनिर्माण क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, वाहननिर्मिती, ऊर्जा आणि औषध निर्माण या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले. भांडवली बाजाराला उच्चांकी पातळीवर पोहोचवण्यास सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कैक वर्षांपासून अडगळीत लोटल्या गेलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर अचानक प्रकाशझोत आला. ‘सेन्सेक्स’च्या ६० हजारांवरून ७५ हजारांपर्यंतच्या प्रवासादरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल दुपटीने झालेल्या वाढीची प्रमुख भूमिका राहिली आहे. सरकारी धोरणे आणि ‘मोदी की गॅरेंटी’ यांच्याशी संबंधित गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधित पीएसयू निर्देशांक आणि पीएसयू बँक निर्देशांक एका वर्षात जवळपास दुप्पट झाले आहेत. जागतिक पातळीवरील आव्हानात्मक वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था वेगाने मार्गक्रमण करत आहे. या आशावादाने प्रेरित होऊन, परदेशी गुंतवणूकदारांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत भांडवली बाजारामध्ये २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्देशक, वाढती देशांतर्गत गुंतवणूक आणि राजकीय स्थिरतेच्या पार्श्वभूमीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा देशांतर्गत भांडवली बाजारावरील विश्वास वाढला आहे. अमेरिकेतील महागाईदराची आकडेवारी लवकरच जाहीर होणार असून, त्यावर अमेरिकी मध्यवर्ती बँक, म्हणजेच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीबाबत निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. अमेरिकेतील रोजगाराची अपेक्षित आकडेवारी, उत्पादन क्षेत्राची कामगिरी ही व्याजदरात संभाव्य बदलाला अनुकूलता दर्शवणारी आहे. अशी अपेक्षा असल्यामुळेच देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये निर्देशांकाने गगनाला गवसणी घातली. शेअर बाजारात नशीब अाजमावणाऱ्यांची संख्या विलक्षण वेगाने वाढत असून, अलीकडच्या काही महिन्यांमधील बाजार तेजीने लक्षणीय प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.