Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा' चित्रपटाची सेन्सॉर बोर्डाकडून अडवणूक!

Manoj Jarange Patil : ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाची सेन्सॉर बोर्डाकडून अडवणूक!

एकाही दृश्यावर आक्षेप नाही; मात्र…

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आणि सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारलेला ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट (Sangharsh Yoddha Movie) यावर्षी २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाची गाणी रिलीज झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मात्र, एका कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाकडून (Censor Board) अडवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एकाही दृश्यावर आक्षेप घेतलेला नाही. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली आचारसंहिता, मतदान आदींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

चित्रपटाच्या टीमने काय म्हटले?

निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, ‘हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे. आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याचं दुःख होत आहे’. तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारा अभिनेता रोहन पाटील म्हणाला की, ‘हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट होणार’.

आता कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल, असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. चित्रपटाच्या टीमने अंतरवाली सराटी येथे ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या. यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितले की, आपला चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने थांबवला असला, तरी २१ जून २०२४ या नव्या तारखेला सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट पाहील. चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मी लवकरच माझ्या वेळेनुसार पत्रकार परिषद घेऊन चित्रपटा विषयी बोलेन असंही त्यांनी म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -