राहाता : राज्यातील महायुती सरकारकडे आत्मविश्वास असल्याने या जोरावरच राज्यात विकास कामे वेगाने सुरू आहेत. तर महाविकास आघाडीकडे अहंकार आहे. या अहंकारामुळेच राज्याचे वाटोळे झाले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी विरोधात केली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यानंतर राहाता शहरातील विरभद्र महाराज मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के,मंत्री दादा भुसे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. किरण लहामटे,आ.आशुतोष काळे,माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री बबनराव घोलप, रामदास कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, जेष्ठ नेते मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, आ.प्रवीण दरेकर, कैलास बापू कोते, राजेंद्र पिपाडा, सचिन तांबे, राजेंद्र गोंदकर, संजय भोर, कमलाकर कोते, संदीप सोनवणे, मनसेचे राजेश लुटे, विजय मोगले यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
घरात बसून राज्य करता येत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. आपण फेस टू फेस काम करतो. फेसबुक लाईव्ह नाही. माझ्या कामामुळे मी राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून परिवर्तन करू शकलो याचा आनंद वाटत असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी सर्वसामान्यांचे सरकार स्थापन केले आहे. संविधान दिन साठ वर्षात कधीही काँग्रेसने साजरा केला नाही, मोदींनी देशात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने दलित व मुस्लिमांंचा वापर व्होट बँक म्हणून केला आहे.जातीपातीचे राजकारण करणाऱ्या पासून सावध राहा असे आवाहन करून मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्प भविष्यात पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच पाणी प्रश्नावरून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र हा वाद कायमस्वरूपी संपण्यासाठी पश्चिमेला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येण्याच्या कामाच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यामुळे गोदावरी खोऱ्यात अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे.प्रारंभी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रास्ताविकात खा.लोखंडे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.