मुंबई: कडक उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटांमध्येच होत असलेली लोकसभा निवडणूक २०२४ लक्षात घेता निवडणूक आयोगाने सोमवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली. ही समिती उन्हामुळे निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करेल. या टास्क फोर्समध्ये निवडणूक आयोग, भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग आणि आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
निवडणूक आयोगानुसार हा टास्क फोर्स प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या पहिल्या पाच दिवसांतील उन्हाळा तसेच उष्णतेच्या लाटांचा अभ्यास करेल.निवडणूक आयोगाकडून हे पाऊल अशावेळेस उचलले जात आहे जेव्हा भारताच्या अनेक भागांमध्ये रविवारी भीषण उन्हामुळे तापमान प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी तर तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ४ ते सहा डिग्री सेल्सियस अधिक मोजले गेले.
आयएमडीच्या माहितीनुसार ओडिशा, रायलसीमा, गांगेल पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही भागांमध्ये कमाल तापमान ४२ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान मोजले गेले. बिहार, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पाँडिचेरी आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सियसदरम्यान होते.
या महिन्यात उष्णतेची लाट येण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्या भागात ओडिशा, झारखंड, गांगेय पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांमध्ये जबरदस्त उन्हाची लाट आली होती. अल निनोची कमकुवत स्थितीदरम्यान हवामान विभागाने आधी एप्रिल ते जून या कालावधीदरम्यान अधिकाधिक उष्णतेचा इशारा दिला होता.
एप्रिलमध्ये देशाच्या विविध भागात चार ते आठ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक उष्णतेची लाट असणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यात मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, बिहार आणि झारखंड आहे.