Friday, July 12, 2024
Homeताज्या घडामोडीBuldhana News : बुलढाण्यात काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर! काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये झाली हाणामारी

Buldhana News : बुलढाण्यात काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर! काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये झाली हाणामारी

अंगावर धावून गेले, गाडीच्या काचाही फोडल्या; उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर नेमकं काय घडलं?

बुलढाणा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार (Buldhana Loksabha) नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांच्या प्रचारार्थ खामगाव (Khamgaon) येथे दाखल झाले होते. मात्र, त्यांची सभा संपताच काँग्रेसच्या (Congress) दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. प्रचारानंतर लगेच हा प्रसंग घडल्याने बुलढाण्यात मविआची प्रतिमा मलीन झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील व स्थानिक महाविकास आघाडीचे नेते मंचावर उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांचे भाषण संपताच नेते आपल्या मार्गाने निघाले.

दरम्यान, सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा (Dilipkumar Sananda) व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण (Tejendra Singh Chavan) यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. दिलीप कुमार सानंदा सभास्थळावरून बाहेर पडत असताना समोरून काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांची गाडी तेथे आली. दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली.

काही वेळाने या शाब्दिक वादाचे रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले. यावेळी काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडविले. या घटनेमुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -