
देशातील एमडीएच आणि एव्हरेस्टसह सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून सर्व मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश
नवी दिल्ली : हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी दोन लोकप्रिय भारतीय मसाल्यांच्या विशिष्ट उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचे सांगत भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या काही उत्पादनांवर बंदी घातली आहे. याची गंभीर दखल घेत भारतातही केंद्र सरकारने अन्न आयुक्तांना देशातील एमडीएच आणि एव्हरेस्टसह सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून सर्व मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
"देशातील सर्व अन्न आयुक्तांना सतर्क करण्यात आले आहे. मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांत देशातील सर्व मसाल्यांच्या उत्पादन युनिटमधून नमुने गोळा केले जातील," उच्च सरकारी सूत्रांनी सांगितले.
"केवळ एमडीएच आणि एव्हरेस्टच नाही तर सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून नमुने घेतले जातील. सुमारे २० दिवसांत लॅबमधून अहवाल येईल," असे ते पुढे म्हणाले.