मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय
सुरत : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. भाजप (BJP) आपल्या ‘४०० पार’ मिशनसाठी कंबर कसून तयारी करत आहे. त्यातच भाजपने सुरतमध्ये (Surat Loksabha) आपलं खातं उघडून दणक्यात सुरुवात केली आहे. भाजपचे सुरतमधील उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) यांचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्याआधीच भाजपाने आपला विजय पक्का करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभणी यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने आणि रिंगणातील इतर सर्व उमेदवारांनी या जागेसाठी आपली बोली मागे घेतल्याने मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दलाल यांना संसद सदस्य (एमपी) प्रमाणपत्र दिले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दलाल यांचे अभिनंदन करत म्हटले की, निवडणूकपूर्व विजय म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या “ऐतिहासिक विजयाची सुरुवात” आहे.
दलाल आणि कुंभानी यांच्याशिवाय सुरत लोकसभा जागेसाठी आणखी आठ दावेदार होते. बहुजन समाज पक्षाचे (BSP) प्यारेलाल भारती हे सुरत जागेसाठीच्या लढतीतून माघार घेणारे शेवटचे उमेदवार होते.
का रद्द झाले काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज?
निवडणूक अधिकाऱ्यांनी काल नीलेश कुंभणी यांचा उमेदवारी अर्ज ‘साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केलेल्या लोकांच्या बनावट सह्या’ या कारणावरून रद्द केला. सुरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचा उमेदवारी अर्जही अवैध ठरला आणि गुजरातच्या प्रमुख विरोधी पक्षाला शहरातील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले. त्यांच्या आदेशात, निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितले की, कुंभणी आणि पडसाला यांनी सादर केलेले चार अर्ज फेटाळण्यात आले कारण प्रथमदर्शनी, प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली. त्या सह्या बनावट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द आदेशात लिहिले आहे.