Saturday, December 14, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलतूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार !

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार !

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

देवाने मानवाला इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी आणि वाणीने सर्वश्रेष्ठ ठरवलेले आहे. बहिणाबाईंचे एक वाक्य आठवते, ‘तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट’ या दोन हातांनी तू काय आणि किती केलं पाहिजे? पण माणूस मात्र कुठेतरी भोगासन्न झालाय! ‘रिकामे मन सैतानाचे घर’ किंवा ‘आळसे कार्यभाग नासे’ वेळीच वेळेचं पळणार घड्याळ महत्त्वाचे क्षण पाळले पाहिजे. पैसा मिळतो, येतो, जातो, कर्ज उधारीवर मिळेल घेतलेले फेडूही.

पण वेळेचं काय? वेळ वाण्याच्या दुकानात मिळणार आहे का? गेलेली वेळ पुन्हा कधीही मिळत नाही! म्हणून वेळ नक्कीच पाळली पाहिजे. बघू, करू यात वेळ अगदी सहज कापरासारखी उडून जाते. वेळीच सावध राहून वेळेचा सदुपयोग करून घेतला की, पश्चातापाची वेळच येत नाही. आपल्या जीवनात सामोरे जाण्याची जिद्द आणि आत्मविश्वास हवा. यासाठी आपल्यातील क्षमता, अंगभूत कौशल्य, सुप्त गुण हे आपण ओळखावे. अनुभवावे. संधी चालून येईल तेव्हा संधीच सोनं करावं. समस्या, भीती, अहंकार, निष्क्रियता, आळस, न्यूनगंड, प्रलोभणे, निराशा, अपयश, नकारात्मकता, खच्चीकरण हे सगळं काढून टाका.

उठा स्वतःला विचारा मी कोण आहे? मला काय करायचे आहे? मला स्वावलंबी व्हायचं आहे! परिस्थिती झुगारा. कामाला लागा. आनंदी बना. गप्प बसू नका. प्रचंड ध्यास, आशावादी, स्वप्नांनी झपाटून, वेडेपणाची धडपड, यशाकडे वाटचाल या सगळ्या गोष्टी करा.

ज्याला का जगायचे कळलं, त्याला कसं जगायचं, हा प्रश्नच पडत नाही! आताच ठरवा, स्वतःची ताकद ओळखा. स्वयंशिस्त लावा, आव्हाने स्वीकारा. चांगल्या सवयी अंगीकारा. सवयी या जशा घडवू शकतात, तशाच त्या तुम्हाला उद्ध्वस्तही करू शकतात. सवयीचे गुलाम होऊ नका. यश संपादनात स्वतःत सुधारणा करा. स्वयंशिस्त आणि यश यांचे खूप जवळचं नातं आहे. आपले आत्मपरीक्षण केल्यावर, स्वतःला तपासल्यावर तटस्थपणे स्वतःला पाहून जाणीव ठेवा.

गुण-दोषावर वेळीच योग्य दक्षता घ्या. माणूसपण जपण्यासाठी. आयुष्याकडे पाहा, संवेदनशीलता जपा. बेजबाबदारपणे वागू नका. ही वेळ आपल्याला उद्ध्वस्त करून टाकते. वेळीच टाका घालता आला, तर पूर्ण वस्त्र उसवत नाही. जीवनात तुम्हाला पुढे जायचं. योग्य शारीरिक, मानसिक, वैचारिक स्थिती संतुलन सुदृढता जपा. आरोग्य जपा. वर्तनामध्ये अनुकूल परिवर्तन करा. प्रभावशाली बना. आपला स्वभाव, व्यक्तिमत्त्व कार्यशैली, आपलं बोलणं-चालणं, वागणं या ज्ञानाचा सामाजिक संबंध, कौटुंबिक संबंध यासाठी केवळ आणि केवळ आपले सद्गुण महत्त्वाचे असतात. आयुष्यात आपला दर्जा उंचावण्यासाठी, आपल्याला हे सद्गुण वेळोवेळी निर्णयासाठी उपयोगी पडतात. जीवन आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी त्यांची गरज असते. इतरांचाही आदर करा, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आजपासून यादी बनवा मी माझे ध्येय, माझे स्वप्न, माझे गुण-दोष, माझे कार्य हे सर्व यादीत समाविष्ट करा. सुधारणा घडवून आणा. ध्येय प्राप्तीपर्यंत वाटचाल केली, स्वतःत निश्चित बदल घडला की हाच असेल, तुमचा आयुष्यातील जीवनातील टर्निंग पॉइंट.

यासाठी अहोरात्र चिकाटीने, जिद्दीने, प्रयत्नशील राहा. आदर्श व्यक्तींचे यशस्वी माणसांचे आत्मचरित्र वाचा. यश काही एका दिवसांत मिळत नाही. त्यासाठी भला मोठा संघर्ष, आव्हाने झेलावी लागतात. संघर्ष करा, सामर्थ्य मिळवा. प्रत्येक यशस्वी माणसाने तेच केले जे तुम्ही तुमच्या यशासाठी कराल. ते म्हणतात ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार! रस्त्यात जाता-जाता एक दगड दिसतो दगडच तो. पण तोच दगड जर मंदिरात दिसला, तर आपण त्याला देव मानून पूजा, नमस्कार करतो. तसेच माणसाचे ज्या माणसाला स्वतःची किंमत असते, त्यालाच लोक महत्त्वाचे स्थान देतात.

म्हणूनच आपली किंमत आपण स्वतः निर्माण केल्याने, त्याला दर्जा प्राप्त होतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा इतर प्राण्यांपेक्षा माणूस हा बुद्धी व वाणीमुळे श्रेष्ठ आहे. मग माणसाने माणसासारखे वागलं पाहिजे. विचार, कृती, युक्ती यांनी प्रयत्नवादी राहिले पाहिजे, जिद्द जिवंत असेल तर माणूस आपल्या जीवनाचा स्वर्ग, नंदनवन करू शकतो, हेच खरे! सतत काम करून बोथट झालेल्या लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीलासुद्धा काढावीच लागते. तसं गंजण्यापेक्षा झिजून सतत कार्यरत, कार्यमग्न राहून आनंदाने जीवन जगावे.

इतरांच्या सत्कार्यासाठी झिजावे. वाहतो तो झरा आणि थांबतो ते डबकं! त्या झऱ्यावर राजहंस जमा होतात आणि डबक्यावर मच्छर जमा होतात. मग आपणच ठरवायचं. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे! सूर्याइतका वक्तशीरपणा अंगी बाणला पाहिजे, नदीसारखं समतेने वाहत राहिले पाहिजे, समुद्रासारखं सगळ्यांना पोटात घेता आलं पाहिजे, झाडासारखं सगळ्यांना सावली, फळफुलं देता आलं पाहिजे, चला शिकूया निसर्गाकडून माणसातली माणुसकीची भावना जपू या ‘नेचर इज फ्यूचर!’ थांबू नका. थांबला तो संपला.’ आपल्या लहानपणीची ससा-कासवाची गोष्ट आजही आठवतेच ना. सतत काही ना काही सर्जन, सृजन नवनिर्मिती करत राहणं हे सजीवतेचं, जिवंतपणाचं लक्षण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -