Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपुण्यात्मा असूनही भीष्म शरपंजरी का?

पुण्यात्मा असूनही भीष्म शरपंजरी का?

विशेष – भालचंद्र ठोंबरे

पितामह भीष्म हे महाभारतातील एक पुण्यवान, ईच्छामरणाचे वरदान प्राप्त असलेले, सत्यवचनी, ज्ञानी, बुद्धिमान व महापराक्रमी व्यक्तिमत्त्व होते. जन्मभर अविवाहित राहून, हस्तिनापूरच्या हितासाठी सदैव जागरूक राहीन, अशी त्यांनी केलेली प्रतिज्ञा ‘भीष्म प्रतिज्ञा’ म्हणून ओळखली जाते. म्हणून कौरव पांडवाच्या युद्धात ते कौरवांच्या बाजूने लढले. मात्र ते पराक्रमी असूनही, अर्जुनाने पूर्वजन्मी स्त्री असलेल्या शिखंडीला समोर करून, त्यांचे आडून शरसंधान करून, भीष्मांना शरपंजरी पाडले. सत्यवचनी व महापराक्रमी असतानाही युद्ध भूमीवर १८ दिवस शरपंजरी पडण्याचे दुर्भाग्य आपल्या नशिबी का यावे? हा विचार त्यांच्या मनी घोळत होता.

युद्ध संपल्यानंतर एक दिवस पांडवासह श्रीकृष्ण युद्ध भूमीवर त्यांच्या भेटीला आले असता, भीष्माने भगवान श्रीकृष्णाला याबाबत विचारणा केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, “हे पितामह, आजपावेतो तुमचे अनेक जन्म झाले. याची कल्पना तुम्हाला पण आहे. पुण्यवान असल्याने, दरवेळेस राजवंशातच तुमचा जन्म झाला. एका जन्मात युवराज असताना व रथातून शिकारीवरून परत येत असताना झाडावरून एक साप घोड्यावर पडला. तुम्ही बाणाच्या टोकाने तो उचलून बाजूला फेकला. तो झाडीत काट्यात पाठीवर पडला. सरळ होऊन उठण्याचा त्याने बराच प्रयत्न केला. मात्र दरवेळेस काटे सापाच्या शरीरात अधिक-अधिक रूतत गेले. वेदनेने तळमळत तो तेथे १८ दिवस पडून होता. अखेर सापाने प्राण सोडताना “तुम्हाला सुद्धा अशाच वेदना सहन करीत, प्राण सोडावा लागेल,” असा शाप दिला.

तुम्ही पुण्यवान असल्याने, आजपर्यंत शापाचा परिणाम होऊ शकला नाही. मात्र द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या लज्जास्पद प्रसंगी तुम्ही गप्प रािहलात. तुम्ही हा दु:खद प्रसंग थांबवू शकत होते, मात्र तुम्ही तसा प्रयत्न ही केला नाही. तेव्हाच तुमचे पुण्य नष्ट झाले व त्यामुळे शापाचा परिणाम तुम्हाला भोगावा लागत आहे.

तात्पर्य : या भूतलावावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या वाईट कर्माचे फळ भोगावेच लागते. तद्वताच स्त्रीचा अथवा तिच्या स्त्रीत्वाच्या अपमानाला कारणीभूत असलेल्या पुण्यवान व्यक्तीचा पुण्य संचयही नष्ट होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -