नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
आनंद बक्षी (आनंद प्रकाश वैद) यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना कोणताही विषय द्या, प्रसंग द्या, त्यावर अगदी अनुरूप गाणे रचणे हा त्यांच्यासाठी जणू एक खेळच होता. राजेश खन्ना या रोमँटिक हिरोचे ते सर्वात आवडते गीतकार! फाळणी पूर्वीच्या अखंड भारतात १९३० साली रावळपिंडीला जन्मलेले आनंदजी फाळणीनंतर भारतात आले, तेव्हा काही दिवस पुण्यात वास्तव्यास होते, ही गोष्ट पुणेकरांना नक्कीच अभिमानाची वाटेल. नंतर ते मीरत, दिल्ली आणि मुंबईत राहिले.
भारतीय नौदलात सेवा केलेल्या, या कवीला अगदी लहानपणापासूनच गाण्याचा आणि कविता लिहिण्याचा छंद होता. त्यांनी सुरुवातीला गायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवायचा प्रयत्न केला. पण त्यांना पहिली संधी मिळाली, ती १९५८ साली ब्रिज मोहन यांच्या ‘भला आदमी’ या चित्रपटात. त्यांना नोंद घेण्यासारखे यश मात्र मिळाले, ते १९६२ साली आलेल्या त्यांच्या ‘मेहेंदी लगी मेरे हाथ रे’ या जबरदस्त गाण्याने. कल्याणजी आनंद बक्षी या गाण्याला इतके ठेकेबाज संगीत दिले होते की, आजही ते ऐकले तर कुणालाही नाचावेसे वाटेल. त्यावर्षी ते बिनाका गीतमालाच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांच्या यादीत १६व्या क्रमांकावर होते. (आणि ‘सरताज गीत’ ठरले रफिसाहेबांनी गायलेले हसरत जयपुरी यांचे ‘एहसान तेरा होगा मुझपर.’)
आनंद बक्षी यांनी १९५६ पासून २००१ पर्यंत हिंदी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक अशी तब्बल ४००० गाणी दिली. ‘मोमकी गुडिया’मधील ‘मैं ढूंड रहा था सपनोमे, तुमको अन्जानो अपनोमे…’ हे गाणे ज्यांनी ऐकले असेल, त्यांना आनंदजींचा आवाजही आठवेल. तो लक्षात राहावा, असा वेगळ्या धाटणीचा होता. अतिशय तरल कल्पनाशक्ती, भाषेच्या डौलावरची पकड आणि समोर येईल त्या पात्राच्या मनात शिरून कविता लिहिण्याची किमया यामुळे त्यांचे नाव तब्बल ३७ वेळा ‘फिल्मफेयर’च्या सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या पारितोषिकासाठी नामांकित झाले आणि प्रत्यक्षात ती पारितोषिके त्यांना ४ वेळा मिळाली. गुणवत्ता अनेक कारणांमुळे दुर्लक्षित राहते हे वास्तव आहे, पण नुसती त्यांच्या गाण्याची यादी केली तरी लक्षात येते की, केवळ लक्षावधी नाही तर कोट्यवधी हिंदी भाषिक आणि हिंदी समजणाऱ्या रसिकांच्या पिढ्यांचे जीवन या माणसाने समृद्ध केले आहे. या कवीने अगदी वेगवेगळ्या विषयांवर विपुल गाणी लिहिली आहेत. तशी हिंदी चित्रपटात प्रेमावरची गाणी असंख्य आहेत. पण शत्रुत्वावर गाणे? लिहिलेय कुणी? खरेही वाटणार नाही, पण आनंद बक्षी यांनी असेही एक गाणे लिहून ठेवले आहे. त्याकाळी माजी प्रेयसीला माफ करणे, प्रेमभंगानंतरही तिचे हित चिंतणे हे कॉमन होते. पण दिग्दर्शकांनी सांगितल्यावर बक्षी यांनी चक्क प्रेयसीला वेगवेगळे शाप देणारे, मनातला सगळा राग व्यक्त करणारे प्रांजळ गाणेही लिहिले होते.
चित्रपट होता १९६६चा-‘आये दिन बहारके.’ धर्मेद्र आणि आशा पारेखबरोबर बलराज सहानी, सुलोचना, लीला मिश्रा, नझिमा, राजेंद्रनाथ, सी. एस. दुबे असा संच होता. लग्न ठरल्यावर प्रेयसीच्या एका नातेवाइकाने धर्मेद्रच्या आईच्या चारित्र्याबद्दलच शंका निर्माण केल्याने, त्याचे आशा पारेखशी ठरलेले लग्न मोडते. तो कमालीचा निराश होऊन जातो. प्रेमभंगामुळे मनाचा तोल सुटलेला प्रेमिक कसा विचार करेल, ते या गाण्यात अगदी उघडपणे व्यक्त झाले होते. अशा या अतिशय दुर्मीळ विषयावरच्या गाण्याआधी धर्मेंद्र पार्टीत आशा पारेखला उद्देशून एक शेर म्हणतो की, ‘मेरे दिलसे सितमगर तूने, अच्छी दिल्लगी की है.
के बनके दोस्त, अपने दोस्तोंसे दुश्मनी की है.’
आणि मग सुरू होते त्याच्या रागाचे, कोणताही विधीनिषेध न बाळगता, केलेले आक्रंदन, उग्र भावनांचे थेट निवेदन! लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनात रफीसाहेबांनी तबियतमध्ये गायलेल्या त्या गाण्याचे शब्द होते-
‘मेरे दुश्मन तू मेरी दोस्तीको तरसे,
मुझे गम देनेवाले तू खुशीको तरसे.
मेरे दुश्मन…’
माणूस काही अगदी आतल्या भावना सहसा उघडपणे व्यक्त करत नसतो. इतरांसमोर तर नाहीच नाही, पण स्वत:जवळही त्याला त्या मान्य करता येत नाहीत, तरीही पहिल्या प्रेमभंगानंतर त्याचे मन अगदी उदास होते, निराश होते, त्याला आपल्या प्रियपात्राचा टोकाचा संतापही आलेला असतो. जाता जाता त्याला-तिला अक्षरश: शाप द्यावेसे वाटतात. एकदा भेटून सगळे सुनवावेसे वाटते.
पण सहसा असे होत नाही. माणूस जगासमोर आणि स्वत:च्या मनासमोरही उदारपणा पांघरतो. ‘जिथे जाशील तिथे सुखी राहा’ अशीच भावना व्यक्त करतो. पण ‘आये दिन बहारके’च्या या गाण्यात मात्र आनंद बक्षी यांनी एक अपवाद निर्माण करून ठेवला होता. अनेक परित्यक्त प्रेमींची मनातली तळमळ त्यांनी बेधडकपणे व्यक्त करून टाकली होती.
पुढे ते म्हणतात की, ‘तू माझ्या जीवनाचा वैशाखवणवा करून टाकलास ना, जा आता तूही शिशिरातले फूल हो. तुला वसंत ऋतूतले फुलणे कधीच माहीत न होवो. मनाची जी तडफड मी भोगतो आहे, तिचाच अनुभव एकदा तुलाही येऊ दे. तुझे सगळे जीवन असे जावो की, तुला जीवनाचा रसरसता अनुभव कधीच न मिळो. मनापासून जगण्याचा एखादा क्षण अनुभवण्यासाठीसुद्धा तुझे मन आसुसलेले राहो.
‘तू फूल बने पतझड़का, तुझपे बहार न आये कभी.
मेरीही तरह तू तड़पे, तुझको करार न आये कभी.
तुझको करार न आये कभी.
जीये तू इस तरह के जिंदगीको तरसे.’
मेरे दुश्मन तू मेरी दोस्तीको तरसे.
मेरे दुश्मन…
मी मनापासून प्रेम केले, ते तू आधी स्वीकारून, नंतर स्वार्थासाठी ते कठोरपणे ठोकरलेस. यामुळे माझ्या आत्म्यातून उठलेल्या वेदनेने तुला हे भोगावे लागणार आहे. तुझ्यासारख्या अप्रामाणिक व्यक्तीला तू केलेल्या प्रतारणेची, विश्वासघाताची आठवण रोज येत राहो. तुझ्या मनाला पश्चाताप इतका घेरून टाको की, साधे सुखाने हसणेसुद्धा तुझ्या नशिबी न येवो.
इतना तो असर कर जाये मेरी वफाएं, ओ बेवफा.
एक रोज तुझे याद आये अपनी जफाये, ओ बेवफा.
अपनी जफाये ओ बेवफा..
पशेमा होके रोये, तू हंसीको तरसे,
मेरे दुश्मन, तू मेरी, दोस्तीको तरसे.
जीवनाची जी बाग फुलवायचा तू प्रयत्न करशील ती उजाड होवो. इतकी की गावाबाहेरची वैराण जमीन, स्मशानसुद्धा तुझ्या बागेपेक्षा हिरवेगार वाटेल. तुला पुन्हा प्रेम तर मिळणार नाहीच, पण कुणाच्या उपेक्षेलासुद्धा तू पात्र ठरणार नाहीस, इतके एकटेपण तुझ्या नशिबाला येवो.
तेरे गुलशनसे जियादा वीरान, कोई विराना न हो
इस दुनियामें कोई तेरा अपना तो क्या, बेगाना न हो
किसीका प्यार क्या तू, बेरुखीको तरसे.
मेरे दुश्मन तू मेरी दोस्तीको तरसे.
मुझे ग़म देनेवाले तू ख़ुशीको तरसे.
मेरे दुश्मन….
आपल्या गीतकारांनी अर्थात जुन्या असे पराक्रम करून ठेवलेत की, अगदी सहज म्हणता येते की, तुम्ही कितीही दुर्मीळ प्रसंग सांगा, जिच्यावर कविता लिहिणे शक्यच नाही, अशी कोणतीही परिस्थिती सांगा, आमच्याकडे उत्तमोत्तम गाणे तयार आहेच. यूट्युबवर जा, बघा, ऐका! ती आठवण देण्यासाठीच तर हा नॉस्टॅल्जिया!