Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनSwatantra Veer Savarkar: सावरकर आणि सवय मराठीची

Swatantra Veer Savarkar: सावरकर आणि सवय मराठीची

मायभाषा – डॉ. वीणा सानेकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हा अमराठी माणसाने निर्मिलेला चित्रपट व त्या संदर्भातील चर्चा यांनी गेले काही दिवस व्यापलेले आहेत. सावरकरांचे अवघे व्यक्तिमत्त्वच भारून टाकणारे आहे. रणदीप हुड्डाच्या या चित्रपटच्या निमित्ताने सावरकर समजून घ्यायला उद्युक्त झालेली माणसे वाढली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सावरकरांचे योगदान या चित्रपटाने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. पण आणखी एक पैलू आहे जो मराठी माणसांनी स्मरणात ठेवला पाहिजे. मराठी भाषेकरिता सावरकरांनी काय केले हे आपण विसरता कामा नये. भाषाशुद्धी संदर्भातील त्यांच्या विचारांचे अवलोकन प्रयत्नपूर्वक करायला हवे.

ते म्हणतात, अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा आक्रमण केले, ते मराठीवरचे पहिले आक्रमण होते. या आक्रमणाचे संकट शिवाजी म्हाराजांनी परतवून लावले. स्वराज्य क्षयानंतर भाषाशुद्धीची चळवळ बंद पडली. मराठीवरचा दुसरा हल्ला इंग्रजीचा होता.

सावरकरांनी या संदर्भात समर्पक दाखला दिला आहे. परके शब्द जेव्हा धनीपणा गाजवायला लागतात किंवा नारायणराव पेशव्यांच्या गारद्यांप्रमाणेच वाटेल तेव्हा मांडीवर चढून धन्यासच ठार मारण्याइतके प्रबल व बहुसंख्य होतात, तेव्हा देखील त्यांस हाकलून न दिले तर त्या भाषेसच ते आपली दासी करावयास सोडीत नाहीत.

सावरकर भेसळयुक्त मराठीची उदाहरणे देतात.“येथील शाळांतील पाचशे इंग्रजी शब्दही पुरे न येणारी सहावी-सातवीतील मुले,’’ मी पेपर जेव्हा हँड ओव्हर केला तेव्हा माझे हेड अेक होत होते, असे म्हणतात. फादर, मदर, वाईफ असे शब्द बोलणारे बोलतात व ऐकणारे ऐकतात. बोलताना मराठीत इंग्रजी शब्द विनाकारण घुसडून देणे हे लज्जास्पद आहे. मराठी भाषेचे धडे शाळांतून नि घरांतून द्यायला हवे असे सावरकरांनी सुचवले, तो काळ कितीतरी जुना होता. (आता तर इंग्रजी वाक्यांतून नावाला मराठी शब्द पेरले जातात.)

एका गृहस्थाने इंग्रजी शब्दांची पाठराखण करताना सावरकरांना म्हटले की, घराबाहेरचा प्रकाश व वायू घेण्यानेच प्रकृती ठीक राहील ना! त्यावर सावरकरांचे म्हणणे असे होते की घराच्या सर्व भिंती प्रकाश यावा म्हणून पाडून टाकणे किंवा पडू देणे आणि घराचे घरपणच नष्ट करणे हा अत्याचारच होईल. घरातल्या कोलीष्टकाप्रमाणे परके शब्द एकदा लागले म्हणून तसेच लोंबकळू देणे, हे अनिष्टच समजले पाहिजे.

परके शब्द वापरल्याने शब्दसंपत्ती वाढते असा बहाणा आपण शोधत राहतो. सावरकर बंदिवासात होते तेव्हाही स्वकीय शब्दांचा आग्रह धरत राहिले. स्वकीय शब्दांची एकदा सवय लागली की विदेशी शब्द कानांना कडू वाटू लागतात, असे त्यांचे म्हणणे होते.

वाचकहो, सावरकरांना स्मरताना हे लक्षात ठेवा की, आपल्या भाषेवर प्रेम असेल तर मराठीतील शब्द दैनंदिन व्यवहारात योजण्याची स्वत:ला सवय लावायलाच हवी तरच घराचे घरपण टिकेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -