Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाजहार्डवर्क स्टडी की स्मार्ट स्टडी?

हार्डवर्क स्टडी की स्मार्ट स्टडी?

मुलांनी परीक्षेत घवघवीत यश मिळावं. त्याकरिता पालक मुलांना नेहमीच ‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही’ हे वाक्य ऐकवत असतात. मग मुलं बाकी सारं विसरून, तासन् तास अभ्यास करतात. त्यामुळे काही मुले ‘हार्डवर्क स्टडी आणि ‘स्मार्ट स्टडी’ करतात.

आनंदी पालकत्व – डॉ. स्वाती गानू

मुलांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवावं. छान मार्क्स मिळवावे. त्यांचं सर्वत्र कोडकौतुक व्हावं, प्रशंसा व्हावी असं बहुतेक सगळ्याच पालकांना वाटतं. त्याकरिता आपण मुलांना हे वाक्य नेहमीच ऐकवत असतो. ‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही.’ (There is no substitute for hard work) मग मुलं बाकी सारं विसरून, तासन््तास अभ्यास करतात. विशेषतः खेळाबाबत त्या वेळापत्रकात जागाच नसते. मग करमणूक तर दूरच. हार्डवर्क म्हणजे खूप अभ्यास, खूप वेळ अभ्यास, फक्त अभ्यास असाच अर्थ अभिप्रेत असतो. पण काम करण्यामागे हेतू आणि दिशा आवश्यक आहे. नुसते प्रयत्न आणि धाडस पुरेसे नसते. असे जोन केनेडी म्हणतात. याचा विचार करायला हवा.

अगदी हेच सूत्र ‘हार्डवर्क स्टडी’ आणि ‘स्मार्ट स्टडी’बाबतीत लागू पडतं. आपल्यापैकी प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळत असतात. त्यामध्ये आपण हे चोवीस तास कसे वापरतो, यावर आपण किती यशस्वी होऊ, करिअर कोणत्या ट्रॅकवर जाईल ते ठरते. काही मुलं दिलेल्या असाईनमेन्ट पूर्ण करण्यात, नियमित शाळेत जाण्यात, त्या २४ तासांत परीक्षा, छोट्या टेस्टचा अभ्यास करण्यासाठी संघर्ष करत असतात. खरं म्हणजे ते रात्रं-दिवस अभ्यास करत असतात. काही मुलं अभ्यास आणि असाईनमेन्टस् करतात आणि चांगले मार्क्सही मिळवतात. मग ते असं काय करतात की घोकंपट्टी न करताही, ते इतक्या चांगल्या ग्रेड्स मिळवतात. खरं म्हणजे त्यांच्या यशाचं रहस्य हे त्यांच्या कठोर परिश्रमापेक्षा स्मार्ट स्टडीला असतं.

‘हार्डवर्क स्टडी आणि ‘स्मार्ट स्टडी’ या दोघांत जो महत्त्वपूर्ण फरक आहे, त्यांच्या यशाचं गुपित या फरकातच दडलेलं आहे. बहुतेक मुलांना असं वाटतं की, खूप अभ्यास करणं, हाच यशाकडे जाण्याचा मार्ग आहे. ते सकाळी उठून धडे वाचतात, उत्तरं पाठ करतात किंवा लायब्ररीत जाऊन अभ्यास करत असतात. जास्त टक्के, हाय ग्रेड्स मिळवण्यासाठी खूप बैठक करून अभ्यास करतात. इतका वेळ अभ्यासासाठी देऊनही, चांगले मार्क्स मिळतील, याची त्यांना खात्री नसते.
अभ्यास करताना काही विशिष्ट टेक्निक उपयोगाला येतात, जे ‘स्मार्ट स्टडी’ करण्यास उपयोगी ठरतात.

आता पाहू या ‘हार्डवर्क स्टडी’ नाही तर ‘स्मार्ट स्टडी’ कसा करायचा?

१) मुलांना स्मार्ट गोल ठरवू द्या.
यश मिळवायचे असेल तर वेग नाही, तर योग्य दिशा ठरवणं, हे जास्त महत्त्वाचं असतं. स्मार्ट स्टडीकरिता ‘वास्तववादी ध्येय’ ठरवणं आवश्यक आहे. ठरावीक वेळेत प्रभावी अभ्यास कसा करायचा, हा दृष्टिकोन ठेवावा लागतो. असं ध्येय तुम्हाला एकावेळेस एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला आणि काम वेळेत पूर्ण करायला मदत करतं. तुमचं ध्येय स्पष्ट, ठरवलेले यश प्राप्त करण्याजोगे आणि रिझनेबल, योग्य वेळेत पूर्ण होईल हे जरूर पाहा.

हे ध्येय ठरवायचं तरी कसं?
१) दिलेल्या वेळेत किती अभ्यास पूर्ण करू शकाल, असे वास्तववादी ध्येय ठरवा.

२) आपल्याला हे ध्येय पूर्ण करण्यासाठी नेमक्या कुठल्या पायऱ्या (स्टेप्स) घ्यायच्या, त्याची यादी करा.

३) तुम्ही ठरवलेल्या स्ट्रॅटेजीनुसार काम करा.

४) आपण ठरवल्याप्रमाणे आपला अभ्यास होतोय का? आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करतोय ना, याचा मागोवा घ्या.

५) तुमची अभ्यासाची जागा नीट तयार (ऑर्गनाईज) करा. ती अशी असावी की, योग्य वेळेत तुमचं अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल. पुरेसा प्रकाश असेल, कुठलाही अडथळा येणार नाही, अशी जागा असावी जेणेकरून तुम्ही अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. अभ्यासाला बसण्यापूर्वीच सगळ्या वस्तू जसे की वह्या, पुस्तकं, स्मार्ट नोट्स जवळ असल्या म्हणजे वेळ वाचेल.

स्मार्ट नोट्स म्हणजे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित फ्लॅशकार्ड्स, फ्लोचार्ट्स, न्यूमॉनिक्स, आकृत्या किंवा व्हीडिओज यांच्या मदतीने तुमची स्मरणशक्ती, लक्षात ठेवण्याची कौशल्ये वाढायला नक्कीच मदत होईल. या नोट्समुळे मुलांचा सखोल अभ्यास होईल, लक्षात ठेवायला नोट्स सोयीच्या होतात. काही गोष्टी स्मरणात ठेवायला, त्या शब्दांची आद्याक्षरांची एक ओळ तयार करून आठवणीत ठेवता येतं.

३) वेगवेगळे विषय, त्यांचे टॉपिक्स यांचा एका दिवशी अभ्यास करणं.
स्मार्ट स्टडीचे आणखी एक प्रभावी टेक्निक म्हणजे एका दिवशी एक किंवा दोन विषयांच्या अभ्यासावर फोकस करण्याऐवजी जास्त विषयांचा अभ्यास करणं. दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करणं, पुन:पुन्हा तेच करणं कंटाळवाणं होऊ शकतं. मुलांची अभ्यास करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. अभ्यासविषयात वैविध्य असले, तर उत्साह टिकून राहतो. यातून मुलं वेळेचे व्यवस्थापन कौशल्य शिकतात. अभ्यास करण्यासाठी अनेक पर्याय ते तयार करू शकतात.

४) इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करणं.
जर मुलांनी धडे, टॉपिक्स वाटून घेतले आणि विषयाची तयारी करून ते पंधरा-वीस मुलांच्या ग्रुपला शिकवले, तर त्यातून मुलांची चांगली तयारी होईल. प्रश्न विचारले जातील. संकल्पना स्पष्ट होतील. मोठ्याने बोलल्यामुळे कोणत्या गोष्टींबाबत आपण नीट समजावू शकलो नाही. कशावर अजून काम करणं आवश्यक आहे, हेही मुलांना कळेल. रोजची उदाहरणं दिलीत, तर संकल्पना स्पष्ट होत जातील. विषयाचा सखोल अभ्यास होईल. आत्मविश्वास वाढेल. आपला अभ्यास तयार झाला, याची मुलांना खात्री पटेल.

५) एकाच वेळी अनेक कामं करणं टाळा.
मल्टीटास्किंग करू शकणं, ही केवळ कल्पनाच आहे. आपण परीक्षेसाठी अभ्यास करताना लक्ष केंद्रित करणं, फोकस असणं खूप महत्त्वाचं असतं. मल्टीटास्किंग केल्याने मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ शकतं. अभ्यास करताकरता टीव्ही, मोबाइल, डिजिटल माध्यमं वापरणं हे स्मार्ट स्टडीच्याकरिता टाळणं आवश्यक आहे. म्हणूनच फोनचे ॲलर्ट्स, रिंगटोन, मेसेजेस खरं म्हणजे नेट डिसकनेक्ट करणंच उचित ठरेल.

६) स्वतःला तपासून पाहा.
आपला अभ्यास किती तयार झालाय, हे तपासून पाहण्यासाठी वेळोवेळी टेस्ट, परीक्षा दिल्या तर हे कळू शकेल. प्रश्न, क्विझ, मॉक परीक्षा दिल्याने सराव होईल. परीक्षेची तयारी होईल. प्रश्नसंच खूप उपयोगी ठरतील. तुमच्या तयारीचे एक स्पष्ट चित्र तुमच्यासमोर तयार होईल. मुलांच्या टाईम मॅनेजमेंटची कौशल्यं अजून विकसित होतील. आणखी किती मेहनत घ्यायला हवी, त्याचा अंदाज येईल.

७) गटात एकत्र येऊन अभ्यास करणं.
‘ग्रुप स्टडी’ हा स्मार्ट स्टडीचा एक उत्तम पर्याय आहे. विशेषतः जर तुम्हाला गोष्टी पुढे पुढे ढकलण्याची सवय असेल, तर हे फायदेशीर ठरू शकतं. मित्र असले तर एक प्रेरणा, स्पर्धा तयार होते. उत्साह वाटतो. मनातील संशय, कन्फ्युजन दूर होतं.

८) कठीण, अवघड टाॅपिक्सना जास्त महत्त्व देणं. त्याची एक यादीच करणं. त्याचा सराव करणं, खात्री होईपर्यंत सराव करत राहाणं. जे धडे जास्त आव्हानात्मक असतात, त्यांच्यापासून सुरुवात करणं, हे योग्य ठरतं. कारण सुरुवातीला आपला मेंदू ताजातवाना, सजग असतो. मग कठीण वाटणारे टाॅपिक्स समजायला वेळ कमी लागतो.

९) दररोज सराव करणं अतिशय आवश्यक आहे.
रिव्हिजन किंवा सराव हा स्मार्ट स्टडी टेक्निकचा एकसंध असा भाग आहे. कारण हे आपल्या शाॅर्ट टर्म मेमरीत राहतं. झोपण्यापूर्वी हे कराच. ठरवल्याप्रमाणे आपला अभ्यास झाला की नाही, याचा आठवड्याला मागोवा घ्या. लक्षात ठेवा

 • हार्डवर्क म्हणजे क्वांटिटी जास्त क्वालिटी कमी.
 •  हा अभ्यास खूप वेळ करत राहावा लागतो.
 •  किचकट आणि गुंतागुंतीचे काम.
 •  केलेला अभ्यास अचूक असेल याची खात्री नाही, तरी ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करायलाच लागतो.
 •  यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. प्रयत्न करावे लागतात. भरपूर वेळ द्यावा लागतो.
 •  यात झोकून देणं, निष्ठा आणि प्रयत्न हे महत्त्वाचे असतात.
 •  एकाच पद्धतीने अभ्यास केला जातो. मानसिक आणि शारीरिक ताण
  मोठ्या प्रमाणात असतो.
 •  नियोजन फार केलं जात नाही.
 •  मेंदूच्या उपयोगापेक्षा शारीरिक श्रम जास्त करावे लागतात.

आणि ‘स्मार्ट स्टडी’मध्ये
○ यात मेंदूबरोबरच तंत्राचा उपयोग जास्त केला जातो. शारीरिक श्रम कमी असतात.
○ कमी वेळेत जास्त अभ्यास.
○ अभ्यासासाठी वेळेचे नियोजन केले जाते.
○ यात अभ्यास हा सांख्यिकी आणि गुणवत्ता या दोघांचे उत्तम मिश्रण असतो.
○ या अभ्यासात प्रभावी पद्धती वापरल्या जातात.
○ तत्पर आणि प्रभावशाली तंत्र वापरल्याने अभ्यास पटकन होतो.
○ हुशारी आणि पटकन विचार करणं यात महत्त्वाचं असतं.
○ तुलनेत ताण कमी असतो. खूप नियोजनबद्ध अभ्यास केला जातो.

आता तुमच्या लक्षात आले असेल की, हार्डवर्क स्टडीजपेक्षा स्मार्ट स्टडी किती उपयुक्त आहे. मग याचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -