Thursday, May 15, 2025

कोलाजसाप्ताहिक

काव्यरंग

काव्यरंग

माझी लेखणी


आयुष्याच्या पानावर
लेखणीने चित्र रेखाटले...
प्रेम, करूणा, त्यागाचे
त्यात रंग मी भरले...

जपते मी लेखणीला
जीवापलीकडे फार...
हाती लागू नये कुणाच्या
शस्त्र हे अति धारधार ...
लेखणीतून माझ्या
प्रसवल्या किती कविता...
बांध घालूनी शब्दांचा
वाहे जणू निर्मळ सरिता...

मानमर्यादेचे कुंपण
लेखणीने घातले स्वतःला...
करू नकोस अपमान कुणाचा
निक्षून सांगते मजला...

लेखणीने माझ्या मी
गणित आयुष्याचे सोडते...
राग, लोभ, मत्सर
जीवनातून वजा करते...

- शिल्पा चऱ्हाटे, मुंबई


शेत


माती न्हातीधुती होते
सोनं केवढा लेऊनी
नाचे गवताच पातं
फुलपाखरू होऊनी

शिवारात मातीला गं
येतो चंदन दर्वळ
जोंधळ्याच्या कणसात
मोती भरले बक्कळ

पाखरांचा येतो थवा
दाणे खाण्यास शेतात
बळी गोफण घेऊन
उभा राहे दिनरात

आला मोहर आंब्याला
कोकिळेचा सूर घुमे
बोरं, चिंचा जांभळाचा
गंध रानी घमघमे

रान तुरा डोलू लागे
साऱ्या शिवारात धुंद
पिकाकडे पाहाताना
बळी लुटतो आनंद

- मानसी जोशी

Comments
Add Comment