Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनलग्न पाहावे करून

लग्न पाहावे करून

दी लेडी बॉस – अर्चना सोंडे

घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून’ अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न करताना किती संघर्ष करावा लागतो हे तिने अनुभवलं आणि त्या अनुभवातून विवाह नियोजन कंपनीची तिने स्थापना केली. ही गोष्ट आहे मेहक सागरच्या ‘वेड मी गुड’ कंपनीची.

मेहक सागरने २००७ ते २००९ दरम्यान दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले. २००८ मध्ये ग्लॅक्सो स्मिथक्लाइन येथे मार्केटिंगसाठी समर इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात केली. २००९ मध्ये ती आयसीआयसीआय बँकेत बिझनेस इंटेलिजन्स युनिटसाठी मॅनेजमेंट ट्रेनी बनली. २०१० मध्ये गुडगावमधील ती अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये जोखीम विश्लेषणासाठी व्यवसाय विश्लेषक म्हणून रुजू झाली आणि त्याच विभागात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून पदोन्नती देखील मिळवली. शेवटी २०१४ मध्ये मेहक ‘वड मी गुडची सह-संस्थापक बनली.

तिच्याकडे एक सर्जनशील बाजू देखील होती. तिला सौंदर्य आणि फॅशन उद्योगाविषयी गोष्टी आवडायच्या. ही आवड जोपासण्यासाठी तिने पीचेस अँड ब्लश नावाचा ब्लॉग सुरू केला. मेहकच्या करिअरचा मार्ग पूर्णपणे बदलण्याच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात होती. त्या वेळी, तिची स्वतःची विवाह नियोजन कंपनी असण्याची कोणतीही योजना नव्हती.

ती आयुष्याच्या अशा टप्प्यावर होती जिथे ती स्वतःच्या लग्नाची योजना आखत होती आणि हैदराबाद शहरात ती नवीन होती. हैदराबादमध्ये लग्नाचे ठिकाण, फोटोग्राफर किंवा मेकअप आर्टिस्ट शोधणे तिला खूप कठीण होते. तिने तिच्या ब्लॉगवर नवीन शहरात लग्नाची योजना आखण्यासाठी आलेल्या सर्व अडचणींबद्दल लिहिले. बऱ्याच लोकांनी ते वाचायला सुरुवात केली. या पोस्टसाठी तिच्या ब्लॉगवर प्रचंड फॉलोअर मिळाले. लोकांचा हा पाठिंबा पाहून तिचं विचारचक्र सुरू झालं. तिने इंटरनेटवर संशोधन केले आणि तिला असे आढळले की, भारतात फारच कमी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत जे वधूंना त्यांच्या लग्नाचे नियोजन करण्यास मदत करतात.

जिथे अनेकांना अडचण दिसायच्या तिथे मेहकला व्यवसायाची संधी सापडली. तिने एक कंपनी तयार करण्याचे ठरवले जे लग्न करू पाहणाऱ्या कोणालाही छायाचित्रकार, लग्नाचा हॉल, मेकअप आर्टिस्ट, केक, लग्नासाठी लागणारे मनोरंजन आणि बरेच काही सहजपणे शोधण्यास मदत करेल. २०१४ मध्ये आपली पूर्ण वेळ नोकरी सोडून मेहकने वेड मी गुड ही विवाह नियोजन करणारी कंपनी सुरू केली. मात्र कंपनी कशी चालवायची याबद्दल तिला पुरेसे ज्ञान नव्हते. कंपनी चालवता यावी यासाठी तिला सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगबद्दल सर्व काही शिकावे लागले. हे तिच्यासाठी पूर्णपणे नवीन क्षेत्र होते; परंतु तिने शून्यापासून सुरुवात केली. सुरुवात कठीण होती, पण लवकरच तिला यश मिळाले.

सुरुवातीला, मेहकला तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण काही वर्षांनंतर, तिने तिची तंत्रज्ञ असलेली टीम तयार केली. कंपनीच्या नावे वेबसाइट सुरू केली. आज तिच्या कंपनीला १० वर्षे झाली. जी आता ५ दशलक्ष वापरकर्त्यांसह भारतातील सर्वात मोठे विवाह नियोजन व्यासपीठ बनली आहे. मेहकची कंपनी हे निश्चित करते की भारतीय वधूंना त्यांच्या लग्नाचे नियोजन करण्यासाठी यापुढे संघर्ष करावा लागणार नाही. ‘वेड मी गुड’ लग्नाची योजना आखणाऱ्या प्रत्येकासाठी खरी भेट आहे कारण तिचा तिच्या कल्पनेवर विश्वास होता!

२०१६ मध्ये मेहक सागरला फोर्ब्सच्या ३० वर्षं खालील वयोगटातील ३० आशियाई उद्योजकांच्या ई-कॉमर्स आणि रिटेल श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले, तर २०१८ मध्ये बिझनेस वर्ल्ड वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने सेक्विया कॅपिटल, एलिवेशन कॅपिटल, बर्जर पेंट्ससारख्या शीर्ष गुंतवणूकदारांकडून ‘वेड मी गुड’साठी निधी उभारला आहे. मेहक सागर महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी आहे. महिला उद्योजकता आणि सक्षमीकरण (WEE) फाऊंडेशनमध्ये ती एक मार्गदर्शक आहेत आणि तंत्रज्ञानात महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांनाही तिने पाठिंबा दिला आहे. ग्लॅक्सो स्मिथक्लाइन येथे मार्केटिंगसाठी समर इंटर्न म्हणून काम करत असताना मेहक आनंद शाहनी या तरुणास भेटली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे २०१२ साली त्यांचे लग्न झाले. ‘वेड मी गुड’ या कंपनीमध्ये आनंद मेहकचा व्यावसायिक भागीदार आहे. लग्न करताना आलेल्या अडचणींना तिने संधीत रूपांतर केले आणि स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं केलं. मेहक सागरचा हा प्रवास उद्योजक होऊ पाहणाऱ्या प्रत्येक तरुणीला मार्गदर्शक ठरेल.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -