
जाणून घ्या तिथी, शूभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत
मुंबई : हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. रामभक्त हनुमानाच्या पूजेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच २३ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाईल. यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने तिचे महत्त्व आणखी वाढले आहे. सविस्तर जाणून घ्या हनुमान जयंतीचे शुभ मूहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत
हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त:
हनुमान जन्मोत्सवातील पूजेची शुभ वेळ सकाळी ९ वाजून ३ मिनिटे ते १० वाजून ४१ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून ४ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी, अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत असेल.
हनुमानजयंती पूजा करण्याची पद्धत:
- हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं. बजरंगबलीसमोर उपवासाचा संकल्प करा.
- या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणं शुभ असतं.
- हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करा.
- यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा.
- पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश असावा. हनुमानाला बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात.
- यानंतर ७ वेळा हनुमान चालिसा पठण करा. या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करा.