Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलMilky Way: आकाशगंगा

Milky Way: आकाशगंगा

कथा – प्रा. देवबा पाटील

नेहमीसारखी परी यशश्रीकडे आली. यशश्रीने तिचे स्वागत केले आणि दोघीही पलंगावर बसल्या. आज यशश्रीने आधीच परीला चहा दिला.

“परीताई, तुमच्या ग्रहावरसुद्धा आहेत का गं दुर्बिणी?” यशश्रीने प्रश्न केला. “हो. आहेत ना! तुमच्या पृथ्वी ग्रहावरील दुर्बिणींपेक्षा आमच्या मही ग्रहावरील रेडिओ दुर्बिणी खूपच आधुनिक रचनेच्या, लांब पल्ल्याच्या व शक्तिशाली भिंगांच्या आहेत. त्यांमधून आमच्या शास्त्रज्ञांना खूप दूरवरचे व विस्तारित असे अवकाश बघता येते. दुर्बिणीचे तोंड फिरवून अवकाशाचे वेगवेगळे भाग विस्ताराने पाहता येतात, आकाशगंगांचे निरीक्षण करता येते. शक्तिशाली भिंगांच्या दुर्बिणीतून तर या आकाशगंगांमधील अगणित ता­ऱ्यांचे खूप सुंदर दर्शन होते.” परीने सांगितले.

“परीताई, आकाशगंगेत मग तर या अगणित ताऱ्यांचा महापूर असेल?” यशश्रीने विचारले. “हो. खरोखरच, नदीच्या पाण्याच्या पुरासारखा त्यात ता­ऱ्यांचा महापूर आहे, असे आपणास आपापल्या ग्रहांवरून दिसते. तारे हे जरी आपल्या ग्रहावरून आकाशात आपणास जवळ जवळ दिसतात, पण हे तारे एकमेकांपासून खूप दूर आहेत. प्रत्येक ता­ऱ्याला अनेक ग्रह व त्यांपैकी कित्येक ग्रहांना उपग्रह आहेत. ते एकमेकांपांसून खूप दूरवर असले, तरी त्यांचाही एक समूह असतो.

ताऱ्यांच्या समूहाला ‘तारकापूंज’ असे म्हणतात. त्या असंख्य ग्रह असलेल्या अगणित ता­ऱ्यांच्या तारकापुंजांच्या पट्ट्याला ‘आकाशगंगा’ म्हणतात. आकाशात जो ता­ऱ्यांचा पट्टा दक्षिणेकडून निघून, आपल्या डोक्यावरून म्हणजे आकाशाच्या मध्यावरून उत्तर-पश्चिमेकडे म्हणजे वायव्येकडे गेलेला दिसतो, तो ता­ऱ्यांचा पट्टा म्हणजे आपली आकाशगंगा आहे. या आकाशगंगेच्या एका कडेला तुमची सूर्यमाला व तिच्या शेजारी आमची मित्रमाला आहे.” परीने सांगितले.

“आपली आकाशगंगासुद्धा आपल्या सूर्यासारखी गोलच आहे का, मग परीताई?” यशश्रीने योग्य प्रश्न केला. “नाही यशश्री. आपल्या आकाशगंगेचा आकार हा काहीसा लाटण्यासारखा म्हणजे लांबट, चक्राकार, दीर्घ वर्तुळाकृती पण मध्यभागी थोडासा भरीव व फुगीर असल्यासारखा दिसतो. ही आकाशगंगा अतिशय मंद गतीने स्वत:च्या अक्षाभोवती सतत फिरत असते. तिच्या एका कडेला तुमची सूर्यमाला व तिच्या शेजारी आमची मित्रमाला आहे. तुमचा सूर्य व आमचा मित्रसुद्धा हा आपल्या या आकाश गंगेतील अब्जावधी महाकाय ताऱ्यांपैकी एक छोटासा तारा आहे. आपल्या आकाशगंगेच्या कडेने काही ठिकाणी तारे एकत्रित शिंपडलेले आहेत असे दिसतात.” परीने सुलभ भाषेत स्पष्टीकरण दिले.

“हो ताई, ते तसेच खूपच जवळ दिसतात.” यशश्री म्हणाली. “नाही यशश्री, ते जवळ नसतात.” परी सांगू लागली, “वास्तविक पाहता ते एकमेकांपासून खूप दूर असतात, पण ते आपल्यापासूनही खूप अंतरावर असल्याने आपणास तसे ते एकमेकांच्या जवळजवळ वाटतात. अशा तारकासमूहांना ‘तारकागुच्छ’ किंवा ‘तारकापूंज’ म्हणतात. या ता­ऱ्यांच्या समूहालाच ‘नक्षत्र’सुद्धा म्हणतात. आता तुम्ही पृथ्वीवरील लोक ज्याला चांदण्या म्हणतात ना, त्या चांदण्या म्हणजे या अनेक आकाशगंगांमधील असंख्य प्रकाशमान तारेच असतात.” परीने सांगितले,

“दीर्घिका म्हणजे काय असते परीताई?” यशश्रीने विचारले. परी म्हणाली की, “आकाशगंगगांनाच दीर्घिकासुद्धा म्हणतात. या विश्वात असंख्य दीर्घिका आहेत.” “इतर आकाशगंगांचे आकार हे असेच सारखे आहेत का, ते वेगवेगळे आहेत?” यशश्रीने विचारले. “त्यांचे आकार हे वेगवेगळे आहेत. आकाशगंगांचे आकार चपटे, लांबट, फुगीर, वक्र, सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार असे आहेत. त्यांच्या आकारानुसार त्यांचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.

गोल जिन्यासारख्या वक्र, सर्पिलाकार आकाराच्या आकाशगंगा, लंबवर्तुळाकार आकाशगंगा आणि इतर अनियमित आकाराच्या आकाशगंगा. या अतिशय विशाल व अफाट असतात. काही छोट्या छोट्या अनेक आकाशगंगांना खुज्या आकाशगंगा म्हणतात.” परीने खुलासा केला. “वास्तविकत: तारा म्हणजे काय असतो परीताई?” यशश्रीने प्रश्न केला. “तारा म्हणजे पुरेसे वस्तुमान असलेली, आपल्या गाभ्यात आण्विक प्रक्रियेने ऊर्जा निर्माण करणारी, स्वयंप्रकाशित व दीर्घकाळ प्रकाश देणारी आकाशातील नैसर्गिक गोल वस्तू.”

परी उत्तरली. “आपल्या आकाशगंगेत असे किती तारे आहेत?” यशश्रीने प्रश्न विचारला. “आपल्या आकाशगंगेत जवळपास ४०० अब्ज तारे आहेत. आपण पृथ्वीवरून एकावेळी एका ठिकाणाहून त्यांपैकी जास्तीत जास्त ३००० तारे बघू शकतो?” परीने उत्तर दिले. “परीताई आपण थोडासा नाश्ता करू या का.” यशश्री म्हणाली. “आज तर नाही. पुढे करू एखाद्या दिवशी. आता मी निघते.” परी उत्तरली व तिने यशश्रीचा निरोप घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -