Wednesday, August 13, 2025

Fraud: दलालाकडून घर मालक व खरेदीदाराची फसवणूक

Fraud: दलालाकडून घर मालक व खरेदीदाराची फसवणूक

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर


श्यामलाल हा नोकरीनिमित्त गावाकडून मुंबई शहरात आला. काही वर्ष तो इकडे तिकडे मुंबई शहरामध्ये भाड्याने राहू लागला. भाड्याने राहत असताना भाड्यासाठी जास्त रक्कम जात आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यानंतर आपण कर्ज घेऊन कुठेतरी घर घेऊ आणि जे भाड्याला पैसे देतोय तेच व्याज बँकेचे भरू असा विचार त्याच्या मनात आला आणि जर स्वतःच्या हक्काचे घर झालं तर आपण आपल्या गावाकडून कुटुंबाला बोलून घेऊ या विचाराने त्याने मुंबईत घर घेण्याचे ठरवले.


मुंबईत घर शोधणे आणि तेही कमी किमतीमध्ये हे एकट्याला शक्य नाही म्हणून त्याने ओळखीचाच असलेला नातेवाईक जो घर खरेदी-विक्रीची दलाली करत होता त्याला त्याने गाठलं. तो दलाल श्यामलालच्या ओळखीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास होता. दलाल सुरेंद्र लाल याने कमी किमतीमध्ये चाळीमध्ये एक रूम मिळवून दिली. दहा लाखांची रक्कम फिक्स झाली. श्यामलालने सुरेंद्रला मालकाला म्हणजेच संजयला देण्यासाठी अर्धी रक्कम दिली. सुरेंद्रने अर्धी रक्कम संजयला दिली. ती रक्कम घेताना सुरेंद्र आणि श्यामलाल यांच्यामध्ये कागदपत्र तयार करण्यात आले. त्यामध्ये अर्धी रक्कम आलेली आहे, पुढची रक्कम पूर्ण झाल्यावर घर ताब्यात देण्यात येईल. श्यामलालने पुढची रक्कम जमा करून सुरेंद्रच्या ताब्यात दिली. सुरेंद्रने कागदपत्र तयार करून रूमची चावी श्यामलालला दिली.


श्यामलाल हा आपल्या कुटुंबासोबत घरामध्ये राहू लागला. श्यामलालला मुंबईमध्ये स्वतःचे हक्काचे घर घेतल्याचे समाधान होतं. पण घरमालक संजयला जेव्हा समजलं की, श्यामलाल त्या घरात राहायला गेलेला आहे त्यावेळी त्याने श्यामलालला विचारले की मला तू रक्कम पूर्ण दिली नाहीयेस. मग घरामध्ये कसं राहायला आलास? त्यावेळी शामलाल बोलला की, मी सगळी रक्कम तर सुरेंद्रकडे दिली होती म्हणूनच त्याने मला घराची चावी दिली. आपल्या दोघांमध्ये कागदपत्र झालेले आहेत. मालक म्हणाला की कागदपत्र झालेले आहेत पण पूर्ण रक्कम मला मिळालेली नाही. या घराचे कागदपत्र सुरेंद्र याने स्वतःकडेच ठेवून घेतले होते. त्याची कॉपी ना श्यामलाला दिली ना संजयला दिली.


घरमालक संजय सुरेंद्रकडे गेला आणि त्याला विचारलं तू त्यांना घरात कसे राहायला दिलं पूर्ण रक्कम मला न देता. त्यावेळी दलाल सुरेंद्र म्हणाला मी तर तुम्हाला रक्कम दिलेली आहे. त्यावेळी मालक संजय म्हणाला की तू मला सुरुवातीलाच अडीच लाख रुपये दिलेले होते. त्यावेळी अडीच लाखांचे पेपर बनवले गेले होते. त्यानंतर जी उरलेली रक्कम काही दिवसात देतो असं सांगून तू मला चेक दिलेले होतेस ते चेक माझ्याकडे आहेत पण रक्कम काय माझ्या बँकेत आलेली नाही. मालकाला आपली कुठेतरी फसवणूक झाली असं समजतात त्याने पोलीस स्टेशन गाठले व त्याच्या घरात राहत असलेला श्यामलाल व दलाल सुरेंद्र यांच्याविरोधात घरमालक संजयने दहा लाखामधले अडीच लाख दिले. तसेच पुढच्या रकमेचे चेक दिले. पण रूमची पूर्ण रक्कम अजूनही दिली नाही अशी कोर्टामध्ये केस फाईल केली. श्यामलालचं असं म्हणणं होतं की, मी चेक दिले नव्हते पण पूर्ण पैसे सुरेंद्रला दिले होते.


कोर्टाने घराचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले. त्यावेळी संजय आणि श्यामलाल यांनी सुरेंद्रकडे कागदपत्राची मागणी केली असता ते माझ्याकडून गहाळ झाले असं सांगण्यात आले. त्या दिवसापासून सुरेंद्र हा गायब झालेला आहे. श्यामलालने घराची दहा लाख रक्कम ही सुरेंद्रच्या ताब्यात दिली होती. पण त्या रकमेतली अडीच लाख रुपये सुरेंद्रने घरमालक संजयला दिले. शिल्लक साडेसात लाख रुपये रक्कम, घराचे कागदपत्र घेऊन सुरेंद्रने श्यामलाल आणि घरमालक संजय यांची फसवणूक केली. घरमालक संजय आणि श्यामलाल हे मात्र कोर्टामध्ये येरझाल्या घालत आहेत. दलालाकडून घर खरेदीदार आणि घर मालक दोघांचीही फसवणूक करण्यात आली. त्यामुळे मुंबईसारख्या शहरामध्ये घर घेताना सावधानतेची गरज आहे कारण कोण कधी आपल्याला फसवेल हेही समजणार नाही. मग तो आपल्या नात्यातला असो किंवा आपल्या विश्वासातला पैसे बघितल्यावर माणसांची नियत बिघडते.


(सत्यघटनेवर आधारित)


Comments
Add Comment