मोरपीस – पूजा काळे
प्रेमभाव, राग, लोभ, मद, मोह, मत्सर मानवाच्या मूलभूत गरजांप्रमाणे कायम बिलगून आलेले हे षड्विकार म्हणजे; मनाचे विविधांगी आविष्कार होय. यामुळे मानवी मन:पटलावरील तरल अशा अवस्था उद्दपित होऊन, भावना निर्माण होण्याच्या क्रियेला गती मिळते आणि व्यक्तिनिहाय आत्मकेंद्रित भाव-भावनांचा खेळ चालू होतो. हा खेळ एखाद्याला वर्मी लागण्यापूर्वी वा एखाद्या त्याच्या पूर्णपणे आहारी जाण्यापूर्वी परमेश्वरी कृपेने प्राप्त झालेल्या सद्सदविवेक बुद्धीचा विचार होणं गरजेचं आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर बुद्धिगम्य नसून भावगम्य आहे. भाव तैसे फळ। न चले देवापाशी बळ। याचा अर्थ असा की, तुम्ही जसे भाव मनात आणालं, तशी परमेश्वर प्राप्ती मिळवाल.
वरील लेखाचे शीर्षक थोडं वेगळं तरी, उद्बोधक आहे. मुळात रफू करण्याची प्रक्रिया ही कापडासारख्या निर्जीव गोष्टीशी निगडित असली; तरी सजीवांमधल्या भावनेच्या ओलाव्याला धरून ठेवणारी अशी आहे. रफूच्या कारगिरी विचारधारा वैशिष्ट्यपूर्ण आहेच; पण त्या आधी मन समजायला हवं.
क्षणा-क्षणाला दाटून येणारं मन प्रत्येकाकडे असतं. उधळलेल्या मनाचे सूर सर्वत्र घुमतात. मनाच्या व्यथा, कथा, लोभस, गोजिऱ्या, साजिऱ्या, क्लेषदायक असतात, तरी मन ज्याची त्याची गोष्ट, जी दिव्य शक्ती असते. ती ज्याला पेलते तो सावरतो; अन्यथा भरकटलेल्या मनाच्या व्यथाचं इतरत्र विखुरलेल्या दिसतात. अशा या गुंतागुंतीच्या मनाला, बुद्धीच्या लगामाची वेसण घातली तर, भरकटणं थांबेल. या स्पर्धात्मक युगात पळापळा कोण पुढे पळे तो असं म्हणताना, भावनांना पायदळी तुडवण्याचे प्रसंग पाहतो, ऐकतो तेव्हा एकसंध राहण्यासाठी म्हणून रफूचा पर्याय उत्तम वाटतो.
नेहमीचं मानवी मनाचे प्रतिबिंब त्याच्या भावनेतून व्यक्त होते. जसे मन तसे आचार, विचार आणि त्यात घडलेले संस्कार म्हणजे सर्व सिद्धीचे कारण होण्याची एक वहिवाट. मनाला आनंद देण्याच्या गोष्टी निर्व्याजपणे केल्या तर, मिळणारा आनंद हा जगातला सर्वोच्च आनंद म्हणता येईल. या आनंदाची कारण वेगळी असतील. मनाच्या जखमेला सहानुभूतीशिवाय पर्याय नसतो हे खरंय. हसणं, मोकळेपणानं बोलणं, चूक कबूल करणं, दुसऱ्यांचं ऐकणं, हस्तांदोलन, गळाभेट, वाचन, मनन, चिंतन अशा कितीतरी गोष्टी निरोगी मन साकारायला तयार असेल, तेव्हा चांगले विचार आचरणात आणणे ही कठीण गोष्ट राहणार नाही. तत्त्ववेत्ता जॉर्ज ग्रेडर यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे की, एखादं काम करण्याची जेव्हा ओढ लागते, तेव्हा ते काम केवळ कर्तव्य न राहता, इच्छापूर्तीचे समाधान देणारे, आनंद निधान बनते. मनाची व्याख्या, त्याची व्याप्ती संत साहित्यात आपणास आढळते.
भावनांविषयीचं रहस्य; संतांनी आपल्या साहित्यात अचूक उलगडलयं; परंतु आजच्या युगात मात्र, मन हे कुविचारांचं केंद्रबिंदू ठरतयं. यासाठी मनाच्या सत्यतेला आडकाठीच्या अंकुशाने न दाबता उत्कट भावनेच्या संवेदनेनं जागवणं हीच माणुसकीची पहिली पायरी ठरेल. याला कारण सामंजस्य, आदर, स्नेहभाव या त्रिपदी असतील, ज्या आयुष्यात फार मोठा बदल घडवू शकतात. तुम्ही-आम्ही सगळेचं साखळीप्रमाणे जखडलोत. जेव्हा एकाच भावनेने एकत्र आलेले लोक आघाडीवर असतात तेव्हा नकारात्मक भावना घेऊन जगत असलेली माणसं मानसिक संतुलनाच्या बाबतीत ढासळेली दिसतात. चुका करणं हा मानवाचा दुर्गुण असला तरी, झालेल्या चुका पुन्हा न करणं, एवढे शहाणपणा त्याच्यापाशी यायला हवे. सेवा, समर्पण, संगोपन, भक्ती, त्याग यात मोक्ष अभिप्रेत आहे.
गॅस लाइटनिंग हा मानसिक भावनात्मक शोषणाचा प्रकार आपल्याला नवीन नाही. अशा प्रकारच्या शोषणात घरातल्या स्त्रिया, मुली, तर कधी मुलंही बळी पडतात. इतरांवर अंकुश ठेवत; स्वतःला कर्तबगार म्हणवून घेणारे पुरुष यात धन्यता मानतात. या प्रकारच्या शोषणात आई-मुलगी, ताई-बाबा, दादा-वहिनी कोणीही कोणाचं शोषण केलेलं असतं. भावनात्मक शोषण हा एकूणच मानव जातीला काळिमा लावणारा प्रकार आहे.
यात वैफल्यग्रस्त अवस्था, यातनामय वाट, जीवन उद्ध्वस्त करते. रिकामे मन सैतानाचे घर असं म्हणतात. एखाद्या तुफानापेक्षा मनातील वादळं भयानक रूप धारण करतात. रागाने जग जिंकण्यापेक्षा प्रेमाने जग जिंकता येतं, हे शाश्वत सत्य स्वीकारायला हवं. भावना आणि मन यांची कोडी न सुटणारी आहेत. ताणतणाव, राग, मत्सर या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे जगा आणि जगू द्याचा मंत्र. झरू द्या सहृदयतेचे झरे, पसरू द्या सकारात्मकतेचे वारे, फुलवा मनमोकळे हास्य. व्यक्त करा मनातलं रहस्य. पुसून गेलेल्या भावना उमटू द्या हृदयावर, रंगीत धाग्यांनी गुंफण घाला भावनेला. जरतारी काठ वेलबुट्टीचा, रफूत भरूया नवा प्रवास भावनांचा. भावना शून्य जगण्यापेक्षा नितांत सुंदर अशा रफूमध्ये एकदा तरी भावनेला बांधूया.
बारीक विणीतला हा बंध यापुढं सर्वांना बांधून ठेवेलच; पण त्याचवेळी नाती-गोती, कला, साहित्य, संगीत, परमार्थ असा एखादा तडीस नेणारा आनंद मार्ग यामध्ये आपल्याला सापडेल, जो शाश्वत असेल.