Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सशब्दसंचिताचा वासंतिक बहर...

शब्दसंचिताचा वासंतिक बहर…

राजरंग – राज चिंचणकर

मुंबईच्या दादर विभागात स्थित असलेले अमर हिंद मंडळ हे गेली ८ दशके क्रीडा, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असून, मंडळाचे या क्षेत्रांत मोठे योगदान आहे. अमर हिंद मंडळाची वसंत व्याख्यानमाला तर सांस्कृतिक वर्तुळात महत्त्वाचे स्थान राखून आहे. वैचारिक आदानप्रदानाचे व्यासपीठ म्हणून ही व्याख्यानमाला ओळखली जाते. तब्बल ७७ वर्षे अव्याहत सुरू असलेला मंडळाचा हा यज्ञ म्हणजे वसंत ऋतूत फुललेला विचारांचा बहर! अमर हिंद मंडळाच्या प्रांगणात वेचता येणारे, हे शब्दसंचित कायम हाऊसफुल्ल गर्दी खेचत असते आणि आजच्या काळातही व्याख्यानमालेचे महत्त्व अधोरेखित करते.

यंदाच्या ७७व्या व्याख्यानमालेचा शुभारंभ करताना, अमर हिंद मंडळाने या उपक्रमाचे वैशिष्ट्य कायम राखले. मराठी नाटकांच्या दिग्दर्शनाचे शतक गाठणारे ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी यात शुभारंभाचे व्याख्यान दिले. ‘रंगभूमी-जागतिक आणि आपली’ या विषयावरचे विजय केंकरे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान म्हणजे पाश्चात्य व भारतीय रंगभूमी यांच्यातले साम्य आणि फरक थेट पटलावर आणणारे होते. अमेरिका, युरोप व भारतातली रंगभूमी आणि त्या अनुषंगाने एकूणच नाट्य व्यवसायाचे त्यांनी मांडलेले गणित मराठी नाट्यसृष्टीला विचारप्रवृत्त करायला लावणारे आहे.

अमेरिकेतल्या ‘ब्रॉडवे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात ‘ब्रॉडवे’, ‘ऑफ ब्रॉडवे’ आणि ‘ऑफ ऑफ ब्रॉडवे’ असे नाट्यगृहांचे तीन प्रकार आहेत. काही नाटके तर तिथे वर्षानुवर्षे सुरू आहेत. अमेरिकन नाटकांची स्पर्धा तिथल्या चित्रपटांसोबत असल्याने, चित्रपटात जशी दृश्ये दिसतात, तसे चमत्कार तिथल्या नाट्यगृहांत, तंत्र माध्यमाद्वारे घडवून आणले जातात. त्यासाठी तिथे विशिष्ट प्रकारची नाट्यगृहे बांधली गेली आहेत. या उलट लंडनमध्ये होणारी नाटके आशयपूर्ण प्रकारात मोडतात. लंडनमध्ये सर्वत्र नाटकांच्या जाहिरातींचे साम्राज्य पसरलेले दिसते. मात्र अमेरिकेपेक्षा लंडनच्या नाट्यकृती आपल्याला जवळच्या वाटतात. कारण आपल्या नाटकांचा भरही आशयघनकडे अधिक असतो.

पाश्चात्य रंगभूमीवरच्या नाटकांचे अर्थकारण अतिशय काटेकोर आणि उत्तम व्यवस्थापनाचा नमुना सादर करणारे असते. नाटकासाठी ओतलेला पैसा वसूल करण्याचा त्यांचा अभ्यास परिपूर्ण असतो. त्यामागे वापरलेली संकल्पना ठोस असते. नाटक कायम ‘प्लस’मध्ये कसे राहील, याचे अर्थकारण ते आधीच करून ठेवतात. वयाच्या चाळीशीच्या आत असलेले प्रेक्षक नाटकांकडे खेचून आणण्याचे तंत्र त्यांना अचूक साधलेले आहे. ते ज्या व्यावसायिकतेने नाटक करतात, ते शिकण्यासारखे आहे. अमेरिकेत तंत्र, युरोपमध्ये क्लासिक्स आणि भारतात आशयघन नाटके मुख्यत्वेकरून दिसतात.

आजही अमेरिकेत तिथल्या चित्रपटातले प्रख्यात कलावंत स्वतःमधला कलाकार जिवंत ठेवण्यासाठी वर्षातले तीन महिने रंगभूमीवर काम करतात. असे अनेक मुद्दे अभ्यासपूर्ण विवेचन विजय केंकरे यांनी त्यांच्या व्याख्यानात देतात. याप्रकारचे आपल्याकडे काय करता येईल, असा विचार मांडला आहे. त्यांच्या या विचारांचे प्रतिबिंब मराठी नाट्यसृष्टीत किती झिरपेल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

एक ‘बेस्ट’ संध्याकाळ…!

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर हे ‘बेस्ट’ कला आणि क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या ७८व्या जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या लेखन साहित्यावर आधारित ‘बेस्ट अभिवाचन कट्टा’ अंतर्गत ‘एक संध्याकाळ आठवणींची’ हे सत्र ‘बेस्ट’च्या आणिक आगारात पार पडले. प्र. लं. च्या कार्यकाळात ‘बेस्ट’ने त्यांची ‘तक्षकयाग’, ‘अंदमान’, ‘काळोखाच्या सावल्या’, ‘रेवती देशपांडे’, ‘कमलीचं काय झालं’ अशी अनेक नाटके सादर केली होती. प्र. लं. च्या हाताखाली तयार झालेले अविनाश नारकर, अरुण नलावडे, शरद पोंक्षे, शीतल शुक्ल, संजय बेलोसे, मेघा मटकर, माधवी जुवेकर आदी ‘बेस्ट’ उपक्रमाचे कलावंत आज व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावले आहेत.

प्र .ल. मयेकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी अभिनेते नारायण जाधव, लेखक आभास आनंद, नेपथ्यकार प्रकाश मयेकर, रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर आदी ज्येष्ठ रंगकर्मी या संध्याकाळी एकत्र आले होते. अरूण माने, गणेश मिंडे, संविद नांदलस्कर, रमण चव्हाण, सुभाष लोखंडे, माधव साने, प्रवीण नाईक, माधवी जुवेकर, नाट्य विभागाचे मानद सचिव प्रमोद सुर्वे या आताच्या कलाकार फळीने प्र.लं.च्या काही गाजलेल्या नाटकांचे प्रवेश यावेळी सादर केले. कला विभागाचे सरचिटणीस विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही संध्याकाळ रंगकर्मींनी अगदी ‘बेस्ट’ करून सोडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -