Tuesday, July 1, 2025

Thane RTO: मुजोर रिक्षा चालकांवर ठाणे आरटीओची धडक कारवाई!

Thane RTO: मुजोर रिक्षा चालकांवर ठाणे आरटीओची धडक कारवाई!

अवघ्या १७ दिवसात तब्बल १० लाखांचा दंड वसूल


ठाणे : ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी, प्रवाशांशी हुज्जत घालणे, वाहतूक नियमांची पायमल्ली केली जाते. अशा मुजोर रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे.


बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी या विभागाने १ ते १७ एप्रिल या काळात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई केली होती. गेल्या सतरा दिवसात तब्बल ६५० रिक्षा चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल १० लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.


पोलिसांनी ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता हे मुजोर रिक्षा चालक रेल्वे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवाशांची दिशाभूल करून गाडीत बसवतात आणि जास्त भाड्याची आकारणी करतात. अशा रिक्षा चालकांवर विभागाने ठाणे प्रादेशिक परिवहन कारवाई केली आहे. बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.



दंडासह परवाना आणि लायसन्स निलंबनाची कारवाई


नियम डावलून जर कोणी रिक्षा चालक वर्तन करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. तसेच नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे, असे ठाणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment