काँग्रेसने विकासाचा गळा घोटण्याचं काम केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस व इंडिया आघाडीवर हल्लाबोल
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सभांचा राज्यात धडाका लागला असून रामटेक, वर्ध्यानंतर आता नांदेड आणि परभणीतही मोदी यांची सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे शिवाजी महाराजांचं नाव घेत मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज की जय. सर्वांना राम राम, नांदेड आणि हिंगोलीकरांना माझा नमस्कार’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. तर पुढे २६ तारखेची तयारी झाली आहे ना? असा प्रश्न विचारत मोदींनी स्थानिकता जपण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या भाषणातून पुन्हा एकदा मोदी यांनी काँग्रेस व इंडिया आघाडीवर (India Alliance) हल्लाबोल केला.
“इंडिया आघाडीचे लोक आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत, हे लोकांनाही समजत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच मतदारांनी इंडिया आघाडीला नाकारले. देशातील २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. जे लोक स्वतःच्या आघाडीवर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का? जे लोक स्वतःच्या आघाडीतच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, अशा लोकांना लोकसभेत स्थान दिले तर तिथेही ते लोक एकमेकांविरोधात संघर्ष करतील. ४ जूननंतर इंडिया आघाडीचे नेते एकमेकांचे कपडे फाडतील”, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या प्रचार सभेत लगावला.
काँग्रेसचा परिवारच काँग्रेसला मत देणार नाही
राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट असल्याचे वाटत आहे. २६ एप्रिलमध्ये जसं वायनाडमध्ये मतदान होईल. त्यानंतर, राहुल गांधींसाठी आणखी एका जागेची घोषणा करुन त्यांना तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे मोदींनी म्हटले. तसेच, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दाखल देत काँग्रेस व इंडिया आघाडीला टोला लगावला. काँग्रेसचा परिवारच, या निवडणुकीत काँग्रेसला मत देणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, जिथं ते राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती काँग्रेसवर येईल असा कधी कुणी विचार केला होता का, असा सवालही मोदींनी विचारला. मित्रांनो, तुम्ही पाहा ४ जूननंतर इंडी आघाडी एकमेकांत लढणार आहे. ४ जूननंतर हे सर्वजण एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांचे केस ओढतील, असा टोलाही मोदींनी नांदेडमधील सभेतून लगावला.
काँग्रसने विकासाचा गळा घोटला
स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षांनी कोट्यवधी गरीबांना शौचालय देण्याचं काम आम्ही केलं, त्यावरुनही काँग्रेसने खिल्ली उडवली. गरीब बँक खातं उघडून काय करणार, डिजिटल व्यवहार हा गरीब आणि अडाणी लोकांचं काम नाही, असे काँग्रेसमधील एक बडा नेता म्हणत होता. काँग्रेसवाल्यांना देशातील गरीबांवर विश्वास नाही. मग, तुम्ही काँग्रेसवर विश्वास ठेऊ शकता का?, असा सवाल मोदींनी विचारला. काँग्रेसने महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटण्याचं काम केलं आहे. काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी गरीब झाला, उद्योगवाढीला चालना मिळाली नाही, असे म्हणत काँग्रेस आघाडीवर मोदींनी टीका केली.