Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सCyber Crime: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावावर लाखोंची फसवणूक

Cyber Crime: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावावर लाखोंची फसवणूक

गोलमाल – महेश पांचाळ

भारतात ऑनलाइन घोटाळे सर्रास होत आहेत. देशभरातील हजारो लोक या घोटाळ्यांना बळी पडले आहेत. त्याच नवी मुंबईतील ४४ वर्षीय व्यक्ती सोशल मीडियावर संशयास्पद व्यक्तींच्या जाळ्यात फसून, सायबर फसवणुकीचा ताजा बळी ठरला आहे. उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन, शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून, या व्यक्तीने स्वतकडील सुमारे ४५.६९ लाख रुपये गमावले आहेत.

संशयित आरोपींनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारदार व्यक्तींशी संपर्क साधला होता. प्रत्यक्ष त्याच्याशी कधीही भेट झाली नव्हती. मात्र, विश्वास बसल्यामुळे, तक्रारदार व्यक्तीने २ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान तब्बल ४५.६९ लाख रुपयांची गुंतवणूक केली.मात्र त्याच्यावर कोणताही परतावा मिळाला नाही. गुंतवणूक आणि मूळ रक्कम वसूल करायची हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला.आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने, त्या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. कलम ४२० (फसवणूक), ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग) आणि भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार ५ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोबाईल क्रमांक आणि सोशल मीडिया आयडी ट्रेस करून तपास सुरू आहे.

याप्रकरणात आणखी एक माहिती पुढे आली आहे. ती म्हणजे, फसवणूक करणारे बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करतात आणि संशय नसलेल्या पीडितांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. एकदा स्वीकारल्यानंतर, ते खोट्या यशोगाथा शेअर करून आणि गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन विश्वास निर्माण करतात. पीडितांनानंतर लवकर नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शेअर ट्रेडिंग किंवा इतर योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पटवून दिले जाते. फसवणूक करणारे पैसे घेऊन गायब होतात, पीडितांचे लक्षणीय आर्थिक नुकसान होत असल्याचे या प्रकरणामुळे दिसून आले आहे. अशाच घोटाळ्यांना बळी पडून, अनेकांना लाखोंचे नुकसान करून घेतल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

सुरक्षित कसे राहायचे?

सायबर घोटाळ्याच्या घटनांबाबत हल्ली नेहमीच लोकांच्या कानावर येत असताना, अनेकजण सापळ्यात अडकतात. सुरक्षित राहणे आणि कोणत्याही प्रलोभन देणाऱ्या आकर्षक योजना टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. अशा घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी, येथे काही महत्त्वाच्या टिप्सकडे लक्ष द्यायला हवे. गुंतवणुकीच्या ऑफरपासून सावध राहा.

अनोळखी कॉल, संदेश किंवा सोशल मीडिया पोस्टवर आधारित कधीही गुंतवणूक करू नका. पैशांची गुंतवणूक करण्याआधी कोणत्याही गुंतवणूक प्लॅटफॉर्म किंवा योजनेचे नेहमी सखोल संशोधन करा. वैयक्तिक आर्थिक माहिती कधीही शेअर करू नका. तुमचे बँक तपशील, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील आर्थिक माहिती ऑनलाइन कोणाशीही शेअर करणे टाळा, विश्वासार्ह चॅनेलद्वारे गुंतवणूक करा. केवळ स्थापित आणि प्रतिष्ठित वित्तीय संस्था किंवा ट्रॅक रेकॉर्ड चांगल्या असलेल्या संस्थांमध्ये गुंतवणूक करा. संशयास्पद गतिविधीची माहिती आढळल्यास तत्काळ तक्रार करा. तुम्हाला ऑनलाइन कोणत्याही संशयास्पद गुंतवणूक ऑफर आढळल्यास, त्यांची ताबडतोब अधिकाऱ्यांना तक्रार करा, अशा सूचना सायबर विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -