२१ एप्रिल रोजी नियोजित दौऱ्यात करणार होते मोठी घोषणा
नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे (Tesla Company) मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (Elon Musk) २१ आणि २२ एप्रिल रोजी भारताचा दौरा (India visit) करणार होते. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी स्वत: याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार होते आणि भारतात गुंतवणूक करण्यासंबंधी एक मोठी घोषणा करणार होते. परंतु हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी दोनदा भेटले होते. यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ते भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी भारतात २० ते ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ही घोषणा होण्याची दाट शक्यता होती. पण, तुर्तास याबाबतची घोषणा त्यांनी पुढे ढकलली आहे.
इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस कार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भारताने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची नीती राबवली आहे. त्याच भूमिकेतून भारत सरकारने एक नवी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती नीतीची घोषणा केली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक कार कंपन्यांना टॅक्समधून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीकोनातून इलॉन मस्क यांचा भारत दौरा महत्त्वाचा होता.
मस्क यांचा दौरा रद्द होण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. नुकतेच, मस्क यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन केले होते.