मला नाही त्यांना वेड लागलंय; आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार
अमरावती : शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत २०१९ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी नेमकी काय चर्चा झाली होती यावरील राजकारण अजूनही सुरूच आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीत जातो, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत केला होता. त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले आहेत, मला नाही त्यांना वेड लागलंय. असा पलटवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
सन २०१९च्या निवडणुकीपूर्वी एका बंद खोलीत विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण निवडणूक निकालानंतर तो त्यांनी पाळला नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. आता एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, असे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते. त्यानुसार, प्रत्येकी २.५ वर्षे शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री असेल, याबद्दल अमित शहा यांच्यासमवेत सहमती झाली होती. शिवाय देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवेन आणि मी स्वतः दिल्लीला जाईन. पण फडणवीस यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा दावा ठाकरे यांनी केला. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरे यांची घराणेशाही असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, आमचे जुने मित्र भ्रमिष्ट झाले आहेत, असे मला वाटते. बंद खोलीत अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असे ते आतापर्यंत सांगत होते. तर आता, मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द दिला होता, असे ते सांगत आहेत. त्यांना वेड लागले असेल, मला तर लागले नाही ना! मी फक्त आदित्य ठाकरे यांना ट्रेनिंग देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा सल्ला दिला होता. त्यांना मुख्यमंत्री काय, केवळ मंत्री करण्याचाही विचार त्यावेळी नव्हता, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना कालपर्यंत भ्रम होता की, अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. तर, आज ते सांगत आहेत की, फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करून आपण स्वत: दिल्लीला जात असल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी आधी ठरवावे की अमित शहा यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीस यांनी! याचाच अर्थ, मी मुख्यमंत्री होईन किंवा माझा मुलगा मुख्यमंत्री होईल, असा केवळ आपल्या परिवाराचाच विचार केला, असा पलटवार फडणवीस यांनी केला.