Friday, December 13, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमराठवाड्यात अवकाळीचा कहर!

मराठवाड्यात अवकाळीचा कहर!

मराठवाडा वार्तापत्र – अभयकुमार दांडगे

मराठवाडा व विदर्भात अलीकडेच वादळी वारे व अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. पुन्हा एकदा निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास पळविला. निसर्गाची मार कधी शेतकऱ्याला बसेल याचा काही अंदाज नाही. सध्या सर्वच पक्षांचे नेते व राजकीय पक्ष निवडणुकीत मग्न आहेत. त्यांना निवडणूक लढविणे व मतांच्या जोरावर जिंकून येणे, याचेच पडलेले आहे. या सर्व गडबडीत शेतकरी दुर्लक्षित राहून जात आहे. अलीकडच्या आठ-पंधरा दिवसांत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याबाबत कोणताही पक्ष व कोणताही नेता तोंडातून ब्र देखील काढायला तयार नाही. जिल्हाधिकारी तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे किंवा बांधावर जाऊन काहीही पाहण्यासाठीही वेळ नाही.

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या गंगाखेड तालुक्यात येळेगाव येथील शेत शिवारात शेतातील कापूस वेचून घरी निघत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास नरेंद्र धोंडीबा शेळके या ६५ वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये त्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे शेळ्या चारण्यासाठी आलेल्या हरीबाई एकनाथ सुरनर यांच्या अंगावर वीज पडली. त्यांचाही जागीच मृत्यू झाला. याबरोबरच सहा जनावरांचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. फळबागांना मोठा फटका बसला. रब्बी पिकांचेही नुकसान झाले. बीड जिल्ह्यातही वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. धारूर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बरसल्या. त्यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेवराई तालुक्यात झाडे उन्मळून पडली. धारूर, वडवणी रस्त्यावरही पहाडी दहिफळ येथे मोठे झाड पडल्याने वाहतूक अनेक तास बंद होती.

लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. दरम्यान औसा तालुक्यातील तीन गावांमध्ये वीज पडून चार जनावरे दगावली. या पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. देवणी, चाकूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. औसा तालुक्यातील फत्तेपूर, किल्लारी, लामजना येथे वीज पडून चार जनावरे दगावली. ज्वारी, द्राक्ष या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. पशुधनासाठी ठेवलेला कडबा भिजल्याने भविष्यात जनावरांना काय खायला द्यावे? या चिंतेत शेतकरी सापडला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, अंबड तालुक्यांसह जालना शहराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, आव्हान, सिपोरा बाजार, दानापूर, वडोद, तांगडा या गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली. आव्हाना परिसरात झाड उन्मळून पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात, तसेच नांदेड तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले. केळी पिकांचे तसेच हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी कपाळावर हात मारून बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत हा तालुका हळदीसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. हळदीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात येणारा पैसा पावसाने हिरावून नेला.

‘सूर्य संपावर गेला तर…’ हा निबंध लहानपणी अनेकांच्या वाचण्यात आलेला असेल. म्हणजेच सूर्याने जर संप केला तर काय होऊ शकेल याचा विचारही केला, तर अंगावर शहारे येतील. अशीच परिस्थिती जर शेतकऱ्यांनी निर्माण केली तर काय होऊ शकेल? याचा साधा विचारही कोणी करत नाही. शेतकरी वर्ग हा ऊन, पाऊस, थंडी या तिन्ही ऋतूमध्ये शेतात राब राब राबतो. तेव्हा कुठे जाऊन शेतात अन्नधान्य पिकते व तुम्ही आम्ही सर्वजण दोन वेळचे जेवण सुखाने करू शकतो. शेतात पिकले तरच शेतकरी आनंदी असेल. जर शेतात काहीही पिकले नाही, तर शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळल्याशिवाय पर्याय नाही; परंतु जर शेतकरी आत्महत्या करत असेल, तर त्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत कोण्याही राजकारण्याने गांभीर्याने विचार केलेला नाही.

सध्या मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याबरोबरच विदर्भात देखील निवडणुकीचे वारे वाहत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणता राजकीय नेता किती गांभीर्याने या विषयावर बोलत आहे? असे विचारले तर त्याचे नकारार्थीच उत्तर येईल. आज कोणताही नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा शेतीच्या समस्यांवर बोलायला तयार नाही. कोणी बोलणार तरी कसे? कारण या बाबतीत अभ्यास असणारे राजकीय नेतेच खूप कमी आहेत. कमी आहेत म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेले नेते आता शिल्लकच राहिलेले नाहीत. ज्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आहे ते नेते होऊ शकत नाहीत व नेते झाले तरी त्यांचा आवाज सत्तेवर असणाऱ्या नेतृत्वापर्यंत पोहोचत नाही, हे सत्य व विदारक असे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात अचानक वादळी वारे, गारपीट व अवकाळी पाऊस झाला. फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाला आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून नेला.

बीड जिल्ह्यात तर शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत. अशा परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणे तर दूर साधी त्यांची चौकशी राजकीय नेत्यांनी केली नाही. शेतकऱ्यांना हे राजकारणी नेहमीच खूप सोप्यात घेत असतात. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या समस्या ओळखून असणारे शेतकऱ्यांचेच काही नेते आहेत. ही नेतेमंडळी ओरडून ओरडून थकून गेलेली आहेत. त्यांचे म्हणणे सरकार कधीही मनावर घेत नाही, असा त्यांचा अनुभव व त्यांची खंत आहे. शेतकरीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकतो, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येईल, तेव्हाच सुधारणा अपेक्षित आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -