
पॅगोडा अँटने झाडावर बांधलेले 'हे' अनोखं वारूळ
ठाणे : पर्यावरणाचा समतोल राखला की आपसूकच त्याठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळतं. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरवरील (विसर्जनघाट) भागात ठाणे महापालिकेने परिसराचा कायापालट केला असताना पर्यावरण संवर्धनाकडे तितकंच लक्ष दिलं आहे. येथील झाडांनी बहर घेतल्यामुळे जंगलात दिसणाऱ्या पॅगोडा अँट मुंग्या चक्क एका झाडावर घरटं बांधून रहात आहेत. लाळ, माती आणि पानांच्या चुऱ्याच्या मदतीने पॅगोडा आकाराचे घरटे तयार केले आहे. ते इतके मजबूत असते की, उन वारा पावसाचा घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही.
सर्वसाधारण मुंगी वारूळ, भिंत, लाकडाच्या पोकळीत आपल जीवन व्यथित करतात. मात्र पॅगोडा अँट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यात असते. घरट्याची रचना पॅगोडा पद्धतीची असते. घरट्यात अनेक कप्पे असून हजारो मुंग्या गुणा गोविंदाने रहातात. उन पाऊस थंडीचा घरट्यावर कोणता परिणाम होत नाही. आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्या पेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात. ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ राहतात. पॅगोडा अँट मुंग्यांच्या संपर्कात आल्यावर ही मुंगी कडकडून चावते. पण सुतार पक्षी याला अपवाद आहे. सुतार पक्षी (woodpecker) हा झाडाच्या ढोलीत पिल्लांचे पालनपोषण करत असला तरी काही वेळा पॅगोडा अँट या मुंग्यांच्या घरट्यात आपली पिल्ल ठेवतो.
जगभरात १२ हजाराहून अधिक मुंग्याचे प्रकार
जगभरात सर्वच देशात मुंग्याचे अस्तित्व असून, सुमारे १२ हजाराहून अधिक मुंग्याचे प्रकार आहेत. सर्वसाधारण आपल्याकडे लाल आणि काळया रंगाच्या मुंग्या आढळतात. यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात. जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती पाहायला मिळतात, असे ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी सांगितले.