Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Chandrapur News : काँग्रेस उमेदवाराच्या नावासमोर 'कॅन्सल'चा शिक्का; कार्यकर्त्यांचा थेट मतदान केंद्रावरच राडा

Chandrapur News : काँग्रेस उमेदवाराच्या नावासमोर 'कॅन्सल'चा शिक्का; कार्यकर्त्यांचा थेट मतदान केंद्रावरच राडा

चंद्रपुरात नेमकं काय घडलं?


चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदानाला (Voting) आज सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश होता. त्यात चंद्रपूरमध्ये (Chandrapur) लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अशातच चंद्रपूरमधील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर राडा केला. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या नावापुढे 'कॅन्सल' असा शिक्का मारण्यात आल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी केंद्रावर चांगलाच राडा केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला.


काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा सवाल केला. तसंच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मतदान केंद्रावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.


काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मतदान केंद्र प्रमुखांनी मारला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित बूथ प्रमुखाला नोटीस दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment