चोवीस तासांत ५ स्फोट; ११ हजार लोकांची सुटका, विमानतळ बंद
जकार्ता (वृत्तसंस्था) : बुधवारपासून इंडोनेशियाच्या माउंट रुआंगवर ज्वालामुखीचा उद्रेक सातत्याने होत आहे. येथे चोवीस तासांत ४ वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. धोका लक्षात घेता रुआंग परिसरात राहणाऱ्या ११ हजार लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. पुढील २४ तास विमानतळ बंद ठेवण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ज्वालामुखीतून सातत्याने लावा आणि राख वाहत आहे. माउंट रुआंगवर पहिला स्फोट मंगळवारी ( दि. १६) रात्री ९: ४५ वाजता झाला. त्यामुळे हजारो फूट उंच लावा उठून राख पसरली आहे. इंडोनेशियातील आपत्ती केंद्र अलर्ट मोडवर आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नुकतेच माउंट रुआंगजवळ दोन भूकंप झाले. लोकांना वाचवण्यासाठी २० बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
याशिवाय रतुलांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे विमानतळ प्राधिकरणाने रद्द केली आहेत. या विमानतळावरून चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. ज्वालामुखीचा प्रभाव शेजारील मलेशियामध्येही दिसून येत आहे. मलेशियातील किनबालु आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमानांना उशीर होत आहे.
रुआंग ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेचा ढग आकाशात २ किमी उंचीवर आला. दुसऱ्या स्फोटानंतर ही उंची २.५ किमीपर्यंत वाढली. देशात एकूण १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत.
तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंडोनेशियातील मारापी ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला होता. या कालावधीत ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. २,८९१ किलोमीटर उंचीवर असलेल्या ज्वालामुखीने सुमारे 3 किलोमीटर उंचीवर राख फेकली होती. २०१८ मध्ये, इंडोनेशियाच्या क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पर्वताचे काही भाग समुद्रात पडल्यानंतर सुमात्रा आणि जावाच्या किनारपट्टीवर त्सुनामी आली आणि ४३० लोकांचा मृत्यू झाला.