
नेटकरी व्हिडिओ पाहून थक्क; व्यक्त केला संताप
ब्राझीलीया : बँकेतून कर्ज घेण्याची गरज प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी भासते. तर काहीजण त्यातून पळवाट काढण्याचा मार्ग शोधतात. असाच एक प्रकार ब्राझीलमध्ये उघडकीस आला आहे. ब्राझीलमधील रिओ डी जानेरिओ येथील एका महिलेने कर्ज मिळवण्यासाठी चक्क मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून बँकेमध्ये आणलं होत. इतकंच नव्हे तर त्याच्याकडून आपल्या नावे कर्ज मिळवण्याचा प्रयत्नही तिने केला. महिला ही मृत व्यक्तीची पुतणी असल्याचं समजलं.
बँकेत मृतदेह आणल्यानंतर महिला त्याच्याशी गप्पा मारत होती. मृतदेहाचं डोकं वारंवार खाली पडत असल्याने ती ते पकडून उभी राहिली होती. तसंच 'काका तुम्ही ऐकताय का? तुम्हाला यावर स्वाक्षरी करायची आहे. मी तुमच्यासाठी सही करु शकत नाही,' असं मृतदेहाला सांगत होती. बँक कर्मचाऱ्यांना या गोष्टीची शंका आल्याने त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. तसेच नंतर रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला.
दरम्यान, डॉक्टरांनी व्हिलचेअरवर बसलेल्या व्यक्तीची तपासणी केली. त्याचा काही तासांपूर्वी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. मिळालेल्या महितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव पॉल रॉबर्टो ब्रागा (वय ६८) आहे. महिलेचे नाव इरिका डीसुझा असल्याचं कळतंय. ती मृत व्यक्तीची पुतणी असून केअरटेकर म्हणून ती काम करायची. तपासानंतर महिलेला घटनास्थळावरुन अटक करण्यात आली आहे. आपण त्याचे नातेवाईक असल्याचा महिलेचा दावा आहे. अधिकारी बँकेच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. हा एखादा मोठा घोटाळा आहे का याचाही तपास करत आहेत.
महिलेला तिच्या काकाच्या बँक खात्यातून कर्ज मंजूर करुन घ्यायचे होते. मृत व्यक्ती हा पेंशनर होता. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी महिला धडपडत होती. बँक कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तीबाबत विचारणा केली, पण महिलेने उडवाउडवीचे उत्तरं दिली. माझं डोकं खाऊ नको, गप स्वाक्षरी कर असं ती मृत व्यक्तीला म्हणत होती. या कारणांनी बँक कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी सदर प्रकाराचा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी महिलेच्या निर्दयीपणावर टीका केली आहे.
A woman in Brazil took a deceased man to the bank in an attempt to secure a loan 😳 pic.twitter.com/abiO2evgwg
— More Crazy Clips (@MoreCrazyClips) April 17, 2024