कृष्ण-अर्जुन नातं हा अवीट गोडी असलेला, कधीही न संपणारा विषय! कृष्ण-अर्जुन यांच्या नात्यात भक्ती आहे, प्रेम आहे. पण याचबरोबर त्यांच्या नात्यात मोकळेपणा आहे. ते खरे गुरू शिष्य आहेत. श्रीकृष्ण-अर्जुन नात्यातील हे नाट्य ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’त रसमय करून मांडले आहे.
ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
मागच्या भागात आपण पाहिलं की, श्रीकृष्ण-अर्जुन नात्यातील पैलू माऊली किती सुंदरतेने साकारतात! श्रीकृष्ण-अर्जुन नातं हा अवीट गोडी असलेला, कधीही न संपणारा विषय! आज आपण त्याचाच पुढील भाग पाहूया.
देवांना शंका विचारून ते बोलत असताना, पार्थ आनंदात निमग्न होऊन गेला. तेव्हा सुखाच्या समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनाला देवांनी वर काढलं. त्यांनी अर्जुनाला भानावर येण्यास सांगितलं. याचं उत्कट वर्णन माऊली करतात. पुढे अर्जुनाच्या तोंडी अप्रतिम संवाद घालतात. ‘तुम्ही माझं प्रेमाने कौतुक करत असाल तर (पुन्हा) जीवदशेस का आणता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की, ‘‘अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही की, चंद्र आणि प्रभा यांचा कधी वियोग घडतो का?’’ ही ओवी अशी की,
तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें। अद्यपि नाहीं मा ठाउकें।
वेड्या, चंद्रा आणि चंद्रिके। न मिळणें आहे?॥ ओवी क्र. २९३.
‘‘आणि असेच बोलून तुला आम्ही जी भीती दाखवतो, तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रीतीस जास्त बळ येते, अशी ही प्रीती होय.’’ ओवी क्र.२९९
श्रीकृष्ण-अर्जुन नात्यातील हे नाट्य ज्ञानदेव किती रसमय करून मांडतात! श्रीकृष्ण-अर्जुन हे मुळात देव-भक्त, गुरू-शिष्य आहेत. इथे ते प्रियकर रूपात साकार होतात. अर्जुनाला इच्छा आहे की, आपण श्रीकृष्णांशी एकरूप होऊन जावं. पण श्रीकृष्ण त्याला पुन्हा भानावर आणतात. का? त्याचंही उत्तर ज्ञानदेवांच्या प्रतिभेने देऊन ठेवलं आहे. हे घडतं प्रीती अर्थात प्रेमामुळे! प्रेमात असलेल्या दोन व्यक्ती. कधी त्यातील एक रुसते. मग दुसरी तो रुसवा पाहते, तो दूर करण्याचा प्रयत्न करते. त्या रुसणाऱ्या व्यक्तीला पाहणं यातसुद्धा किती आनंद मिळत असतो दुसऱ्याला! या झाल्या मानवी नात्यातील गोष्टी!
कृष्णार्जुन नात्यातही ज्ञानदेव प्रेमाचं हेच रूप पाहतात. म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’त रुसलेल्या अर्जुनाचं चित्र येतं. त्या रुसणाऱ्या अर्जुनाला पाहून, श्रीकृष्णांच्या प्रेमाला अधिकच बहर येतो. जसं इथे घडलं आहे.
या नात्यासाठी, प्रेमासाठी माऊलींनी इथे दाखला दिला आहे. कोणता? चंद्र आणि प्रभा यांचा. चंद्र आहे तिथे त्याची प्रभा असणारच. त्या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या कशा होणार? श्रीकृष्ण हे जणू चंद्र आणि अर्जुन हा त्यांची प्रभा होय. या दाखल्यात किती समर्पकता आहे! चंद्र हा सर्व जगाला शीतलता देणारा, तेजस्वी. श्रीकृष्ण हे चंद्राप्रमाणे – त्यांच्या ठिकाणीही तेज आहे. पण ते कसं? तर थंडावा देणारं. अर्जुनाच्या तापलेल्या मनाला शांत करणारे ते जणू चंद्र.
अर्जुन हा जणू त्यांची प्रभा. कारण त्याच्या भक्तीने, ज्ञानाने तोही एक टप्पा गाठतो आहे, त्यांच्याजवळ येऊन पोहोचला आहे. चंद्राची प्रभा जशी त्याच्यासोबत असते, त्याप्रमाणे.
म्हणून तो देवांना पुढील प्रश्न करतो. ‘आत्म्याचा कर्माशी संबंध नाही. कर्माला कारणीभूत पाच गोष्टी सांगण्याची तुम्ही प्रतिज्ञा केली. ते माझे देणे मला द्या.’ या बोलण्याने श्रीकृष्ण संतोष पावतात. ते म्हणतात ‘याविषयी तू धरणे घेऊन बसलास. असा विचारणारा आम्हांला कोठे मिळतो आहे?’
इथे आपल्याला कळतं की, यात भक्ती आहे, प्रेम आहे. पण त्याचबरोबर या नात्यात एकदम मोकळेपणा आहे. ते सच्चे गुरू-शिष्य आहेत. म्हणून अर्जुन शंका विचारण्यास कचरत नाही. तसेच श्रीकृष्णही शंकेचं निवारण करण्यासाठी आतुर आहेत. असं हे नातं आदर्श गुरू-शिष्य, प्रियकर, सखा, मार्गदर्शक असं अनेकरंगी! अशा संवादातून म्हणूनच ‘ज्ञानेश्वरी’ जीवंत होते. ही किमया ज्ञानदेवांच्या प्रज्ञेची, प्रतिभेची! म्हणूनच आज ७२५ वर्षं उलटली तरी ‘ज्ञानेश्वरी’ रसाळ वाटते. त्याचबरोबर त्यातील तत्त्वज्ञानाने ती तितकीच ताजीही वाटते. आजही!