रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर
मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) मतदानाला (vote) उद्यापासून सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान होणार आहे. निवडणूक तोंडावर आली तरी महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत यावरून अनेक दिवस चर्चा सुरु होती. आता त्या चर्चेचे निवारण झाले आहे. भाजपाकडून नारायण राणे (Narayan Rane) यांचे एकमेव नाव चर्चेत होतं. तर शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर अखेर भाजपाने झेंडा रोवत नारायण राणे यांना मैदानात उतरवलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपाकडून (BJP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपाकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. त्यामुळे महायुतीकडून नारायण राणे हे उमेदवार असणार आहेत. तर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.
महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी त्या जागेसाठी इच्छुक असणारे किरण सामंत यांचे बंधू मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी उदय सामंत यांनी उमेदवारीवरून असलेला तिढा सुटल्याचं सांगत राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास आम्ही पाठिंबा देऊ असं म्हणत भूमिका स्पष्ट केली. नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत त्यांचं काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंतांनी दिली आहे. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील,असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
शिंदे गटाची माघार
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून निवडणूक लढवायची होती, असा शिवसेनेचा दावा मागे घेण्यात आला. आता या जागेतील भाजपाचे उमेदवार नारायण राणे असल्यामुळे शिंदे गटातील किरण सामंत यांनी माघार घेतली आहे.
सामंत बंधूंनी सामंजस्याची भूमिका दाखवली
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी जवळपास नारायण राणेंचे नाव निश्चित होते. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या जागेसाठी इच्छुक होते. रत्नागिरीत सध्या उदय सामंत आणि सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे ताकत आहे. उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत सामंत बंधूंनी सामंजस्याची भूमिका दाखवली आहे. सध्या महायुतीमध्ये नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहेत, तर सावंतवाडीचे दिपक केसरकर आमदार आहेत. उद्या नारायण राणे हे अर्ज दाखल करणार आहेत.