पुणे : महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे शरदचंद्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.३० वाजता हे तीनही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर रास्ता पेठ येथील हॉटेल शांताईसमोर महाविकास आघाडीची सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. या सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके सभेला मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीचे गुरूवारी रणशिंग फुंकणार आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार हेही गुरुवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज पुढील आठवड्यात मंगळवारी (२३ एप्रिल) दाखल करण्यात येणार आहे. मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची सभाही आयोजित करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवरून सुरू झाले आहेत.