जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
देवावर प्रेम करणे म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे काय? जो देवापासून विभक्त झालेला नाही, ज्याची देवाशी युती झालेली आहे, जे देवाशी समरस झाले आहेत, तो भक्त. भक्तीची व्याख्या ही प्रेमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की, त्याने तुम्ही समरस होऊ शकता. समरस होणे महत्त्वाचे आहे. मीठ पाण्यात टाकले की, ते समरस होते म्हणजे मीठरूपाने ते राहत नाही, पण ते खारट रूपाने उरते. साखर पाण्यात टाकली की, ती ही विरघळते व समरस होते. विरघळते याचा अर्थ काय? ती साखररूपाने उरत नाही, तर गोडी रूपाने उरते. तसेच सद्गुरू आणि शिष्य, देव आणि भक्त. खरे तर दोन्हींचा अर्थ एकच आहे. हे दोन्ही समरस जेव्हा होतात, तेव्हा तो भक्त राहत नाही, तर तो भगवंतच होतो. शिष्य हा शिष्य राहत नाही, तर सद्गुरूच होऊन जातो आणि उरतो काय? उरतो फक्त आनंद. तुका म्हणे ‘आता’ आता हे अधोरेखित करायचे.
“तुका म्हणे आता आनंदी आनंद, गावू परमानंद मनासंगे” “अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता”, कधी? “चरणी जगन्नाथा चित्त ठेले”.
आता हे महत्त्वाचे आहे. आता म्हणजे केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. डोके म्हटलेले नाही. चित्त का म्हटले? देवाच्या चरणावर चित्त ठेवतो आणि तिथे जेव्हा ते स्थिर होते, तेव्हा ते चित्त उरतच नाही. चित्ताचे चैतन्य होते. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया
तेथे बोला कैचि उरे, माझा मीपण झाला हरी
पुढे काय म्हणतात,
चित्तचैतन्य पडता मिठी, दिसे हरीरूप अवघी सृष्टी
तुका म्हणे सांगो काय, एकाएकी सृष्टी हरीमय
सांगायचा मुद्दा हा की, चित्त आपण देवाच्या चरणावर ठेवले पाहिजे व मग तिथेच स्थिर झालं पाहिजे. मग चित्ताचे चैतन्य होते. हे चित्ताचे चैतन्य होणे म्हणजेच साक्षात्कार. लोकांना साक्षात्कार म्हणजे काय हे कळतच नाही. खरा साक्षात्कार म्हणजे चित्ताचे चैतन्य झाले पाहिजे. एके ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर म्हटलेले आहे. चित्त परतोनि पाठीमोरे ठाके आणि आपणाते आपण देखे.
देखत म्हणे ते हो म्हणे तत्त्व ते मी, इथे ओळखी ऐसे
सुखाच्या साम्राज्यी बैसे, चित्त समरसे विरोनि जाय
किती सुंदर सांगितलेले आहे. हे चित्त जेव्हा ज्या वेळेला देवाच्या दिशेने प्रवाहित होते, तेव्हा ते चित्त राहतच नाही. ते चैतन्यच होऊन जाते. ते चित्त जेव्हा जगाच्या दिशेने वाहते, जगदाकार होते, तेव्हा चांगले होते किंवा वाईट होते. चांगले केव्हा होते? विश्वामध्ये विश्वंभर पाहायला लागलात, विश्वामध्ये विश्वनाथ पाहू लागलात, जगामध्ये जगदीश पाहू लागलात, जनामध्ये जनार्दन पाहू लागलात की, ते चांगले होते.