पनवेल : खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी कोपरा येथील मार्ग सोयीस्कर ठरतो. मात्र, तेथून बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येणारा कोपरा पूल धोकादायक ठरत आहे. सध्या त्याचा एकेरी मार्ग सुरु आहे. मात्र त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रांजणपाडा, ओवे, कोपरा गावातील रहिवाशांसाठी हा पूल सोयीचा असला तरी तो धोकादायक स्थितीत असल्यामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांना पनवेलकडे जाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतराचा फेरा मारुन सायन-पनवेल महामार्गावर जावे लागते. यामुळे, अवघ्या काही सेकंदाचे अंतर कापण्यासाठी नागरिकांना बराच वेळ वाहतूककोंडीत अडकावे लागते. पण आता सिडकोने याबाबतीत मोठे पाऊल उचचले आहे.
खारघरच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या कोपरा पूल परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न आणि जीर्ण झालेल्या पुलावर उपाय म्हणून सिडको आणखी एक पुल बांधणार आहे. सिडकोने या पुलाचे बांधकाम हाती घेतले असून या कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा पुल थेट शीव-पनवेल सागरी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. सात मीटर रुंदीचा हा पूल असून या पुलामुळं खारघरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, कोपरा पुलावर कायमस्वरुपी मोठा पूल नियोजित आहे. मात्र, पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमुळं यात अडथळा येत आहे. त्यामुळे या पुलाचे काम रखडले आहे. या मार्गावरील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी सिडकोने पुलाच्या स्वरुपाने तात्पुरता पर्याय काढला आहे. मुंबईकडे जाण्यासाठी कोपरा पुल हा एकमेव पर्याय असल्याने वाहनचालकांना नाइलाजास्तव विरुद्ध दिशेने वाहन चालवावी लागतात. मुंबईकडे जाण्यासाठी देखील पर्यायी मार्ग सिडकोने तयार करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.