राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीसाठी जनजागृतीचे धडे
ठाणे : तंबाखूच्या सवयीमुळे तोंडाच्या कर्करोगाला निमंत्रण मिळत असताना देखील अनेकजण तंबाखूच्या आहारी जाताना दिसतात. शाळांच्या जवळपासच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असतानाही अनेक ठिकाणी पानटपरीवर विडी, सिगारेट, गुटखा इत्यादी विकले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी देखील अमली पदार्थांच्या आहारी जातात. या कारणांमुळे विद्यार्थ्यांना तंबाखूपासून परावृत्त करण्यासाठी ‘तंबाखू मुक्त शाळा’ हा उपक्रम राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाआरोग्य प्रशासनाकडून राबवला जात आहे.
ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनापासून दूर ठेवण्याकरता जिल्हा आरोग्य प्रशासन, ठाणे सिव्हील रुग्णालय, सलाम मुंबई फाऊंडेशनसह इतर १७४ तंबाखू मुक्त आरोग्य संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवले जाते. यासाठी शाळांमध्ये जाऊन जनजागृती शिबिर, पोस्टर द्वारे विद्यार्थ्यांना तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम याची माहिती दिली जाते. ठाणे जिल्हापरिषदेच्या तीन हजार १५३ शाळांपैकी ९३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असल्याची माहिती सिव्हील रुग्णालयाच्या दंत शल्य चिकीत्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.
तंबाखू मुक्त शाळा अभियानात विविध निकषांचा समावेश
२०१७ पासून सुरू झालेल्या तंबाखू मुक्त शाळा अभियानात काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शाळेत साधारण पाच फूट उंचीचे तंबाखू जनजागृतीचे फलक लावणे, शाळेच्या आवारापासून १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री होणार नाही याची दक्षता घेणे आणि शाळेत तंबाखू जन्य पदार्थ किंवा त्या संदर्भात काही आढळणार नाही याची पुरेपुर काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक संस्थेत किमान सहा महिन्यातून एकदा तंबाखू नियत्रंण आधारावर कार्यक्रम आखणे महत्वाचे आहे. सर्व निकष शाळेने पूर्ण केल्यावर ही माहिती सलाम मुंबई फाऊंडेशन ॲपवर पाठवावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
तंबाखू शाळा मुक्तीच्या उपक्रमात शिक्षण विभागाचा खूप मोठा वाटा आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणे, गैर मार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे यांवर पाळत ठेवून, २०१७ पासून आत्तापर्यंत जिल्ह्यात १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे सिव्हील रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.