अभिनेत्री जान्हवी कपूरने केला आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज
मुंबई : ‘धडक’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर विविध भूमिका साकारताना दिसत आहे. जान्हवी कपूरची भूमिका असलेल्या आगामी ‘उलझ’ चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. ती आता एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुधांशू सारिया दिग्दर्शित या देशभक्तीपर थ्रिलरमध्ये जान्हवीसोबत गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू मुख्य भूमिका साकारत आहेत.
गेल्या वर्षभरापासून जान्हवी कपूर ‘उलझ’ चित्रपटाच्या चित्रीकरणासंदर्भात अपडेट देत होती. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. आता तिच्या ‘उलझ’ चित्रपटाच्या टीझरसह प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
‘उलझ’ या चित्रपटात जान्हवी कपूर भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती साकारत असलेल्या आयएफएस सुहाना भूमिकेचा या मोहिमेतील हेतू सांगतानाच्या व्हाइस ओव्हरसह टीझरला सुरुवात होते. “गद्दारी की कीमत सिर्फ जान से चुकाई जा सकती है।” या ‘उलझ’ चित्रपटाच्या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये तिच्याबाबतीत अनेक थ्रिलर गोष्टी घडताना दिसतात. या चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेल्या कट उधळवताना पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी यांच्याही भूमिका आहेत. तसेच टीझरमधील जान्हवीच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. “लबाडी, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा” असे लिहून जान्हवीनं ‘उलझ’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.